शेती अवजारे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ! अमरावती पोलिसांची मोठी कारवाई, सहा जण अटकेत

अमरावती :- अमरावती जिल्ह्यात शेती अवजारांची चोरी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे! स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत सहा जणांना अटक करण्यात आली असून, लाखोंच्या मालासह चोरीच्या अनेक घटनांचा छडा लावण्यात आला आहे. शेती व्यवसायाला बाधा आणणाऱ्या या टोळीने अखेर काय कबुली दिली? आणि पोलिसांनी हे कसे उघडकीस आणले? पाहूया आमचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट
अमरावती ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांत शेतीसाठी उपयुक्त असलेली अवजारे, मोटर पंप, स्प्रिंकलर आणि पाईप चोरीच्या घटना वाढल्या होत्या. यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. अखेर पोलिसांनी याची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला चोरांची टोळी पकडण्याचे आदेश दिले. तपास करत असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अचलपूर भागातील काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली!
पोलिसांनी अटक केलेले आरोपी हे मागील काही महिन्यांपासून अमरावती ग्रामीण भागात चोरी करत होते. ही टोळी गावांमधील निर्जन शेतांमध्ये रात्रीच्या वेळी शिरून शेतकऱ्यांची महत्त्वाची उपकरणे लंपास करायची. विशेष म्हणजे, ही चोरी केलेली सामग्री अचलपूरच्या भंगार व्यावसायिकांना कमी दरात विकली जात होती. आरोपींकडून चोरीची ३ मोटर पंप मशीन, ४७ स्प्रिंकलर नोझल, ९ प्लास्टिक पाईप, मोठ्या प्रमाणावर अॅल्युमिनियम तार आणि २ मोटरसायकली असा २,२०,७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे!
स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात सखोल तपास करून आरोपींनी ज्या ठिकाणी गुन्हे केले होते, त्या सर्व पोलिस ठाण्यांमधील नोंद तपासून १३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या टोळीच्या मुसक्या आवळल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे!