अंबड बसस्थानकात घडले थरारक; बसचे ब्रेक फेल होऊन थेट घुसली प्लॅटफॉर्मवर, दोन प्रवाशांचा मृत्यू

जालना :- राज्य परिवहन महामंडळाच्या अंबड बसस्थानकावर आज दुपारच्या सुमारास बस अपघाताचा थरार घडला आहे. चालकाने बस चालू करताच बस थेट प्लॅटफॉर्मवर घुसली. यामुळे बसस्थानकात बसच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहे. या बस अपघातामुळे बसस्थानकात प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता.
राज्य परिवहन महामंडळाच्या जालना विभागातील अंबड येथील बस स्थानकावर सदरची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. बसस्थानकावर प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. एसटीमधून प्रवास करणाऱ्यांना सवलत मिळत असल्याने बहुतांश प्रवासी हे बसची प्रतीक्षा करत थांबलेले असतात. त्यानुसार अंबड बसस्थानकावर दुपारी प्रवाशांची गर्दी असताना हा अपघात घडला आहे. अंगावर थरकाप उडविणारा अपघात काही क्षणात घडल्याने धावपळ उडाली होती.
चालकाचे सुटले नियंत्रण
दरम्यान दुपारी जालना जिल्ह्यातील अंबड येथील बसस्थानकावरती बस चालकाने बस मार्गस्थ करण्यासाठी चालू केली. यानंतर पुढे नेण्यासाठी गिअर टाकताच बस पुढे गेली. बसचे ब्रेक फेल असल्यामुळे चालकाने ब्रेक दाबूनही बस थांबली नाही. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून बस थेट प्लॅटफॉर्मध्ये जाऊन थांबली. या अपघातामध्ये बसच्या प्रतीक्षेत असलेले दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. मयतामध्ये शेवगा येथील मुरलीधर काळे (वय ६५) यांचा समावेश आहे. तर चार जण जखमी झाले आहेत.