पेपरफुटी प्रकरणात प्रशासनाची कडक भूमिका आवश्यक – विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ठोस पावले गरजेची!

जालना पाठोपाठ आता यवतमाळच्या महागाव तालुक्यातील कोठारी येथे पेपरफोडीचे प्रकरण समोर आले आहे. परीक्षा केंद्राचे संचालक श्याम तास्के यांच्यावर प्रश्नपत्रिका लीक केल्याचा आरोप झाला असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण प्रकरणावर एक नजर टाकूया.
जालना पाठोपाठ यवतमाळच्या महागाव तालुक्यातील कोठारी येथेही परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची गंभीर घटना घडली आहे. शिक्षण विभागाच्या पथकाने तात्काळ चौकशी करत कोठारी येथील परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक शाम तास्के यांच्याविरुद्ध महागाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
महागावचे विस्तार अधिकारी शिक्षण विजय बेतेवाड यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम 1982 अंतर्गत कलम 5 आणि 6 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, परीक्षांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासन या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
या प्रकरणाची चौकशी सुरू असून, शिक्षण विभाग आणि पोलीस अधिक तपास तर करत आहेत, प्रकरणात जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली नाही, तर भविष्यात शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास उडण्याची शक्यता आहे. आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिक्षण क्षेत्रात पेपरफुटी हा गंभीर विषय बनला आहे. काही जण पैशांसाठी हा गैरप्रकार करत असले, तरी त्याचा फटका निष्पाप विद्यार्थ्यांच्या भविष्यात बसतो. अशा प्रकारांवर प्रशासनाने ‘रात गई बात गई’ असा हलगर्जीपणा न दाखवता, कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.