मा.ना.श्री. चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री यांनी दिली महानगरपालिकेला भेट

मा.ना.श्री. चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अमरावती जिल्हा यांनी आज अमरावती महानगरपालिकेला भेट दिली. यावेळी मा.ना.श्री. चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अमरावती जिल्हा यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये आज दिनांक २१/०२/२०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेमध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
मा.ना.श्री. चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अमरावती जिल्हा यांनी प्रथमच अमरावती महानगरपालिकेला भेट दिल्याबद्दल त्यांचा यावेळी पुष्पगुच्छ, श्रीफळ, शाल, सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
या बैठकीत मा. पालकमंत्री महोदयांनी माध्यमनिहाय शाळा, विद्यार्थी व शिक्षक संख्या, मागील पाच वर्षातील अमरावती मनपा शाळांतील पटसंख्येच्या तुलनात्मक आढावा घेतला. आरोग्य, स्वच्छता व शिक्षणाला निधीची कमतरता पडू देणार नाही. शिवटेकडी येथे नविन आराखडा बनवून शासनाकडे निधीची मागणी करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. फिशरीज हबमुळे रोजगार निर्मिती होवू शकणार आहे त्यामुळे सदर व्यवसायात काम करणा-या संस्थांना आर्थिक सहाय्य करण्यात येईल. स्वच्छतेसाठी महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचा-यांना प्रशिक्षणसाठी इंदोर येथे पाठवावे. शहरातील विविध संस्थांना महानगरपालिकेचे चौक दुभाजक देखरेखीसाठी देण्यात यावे. शहरातील विविध भागात भाजीमार्केट निर्माण करावी. शहरात हॉकर्स झोनची निर्मिती करावी. अमरावती शहराचा सीसीटीव्ही चा विषय त्वरीत मार्गी लावण्यात येईल. प्रत्येक अधिका-याने नाविण्यपुर्ण योजना राबवून अमरावती शहराचा सन्मान वाढवावा. कायाकल्प प्रकल्पातंर्गत प्रथम, व्दितीय व तृतीय शहरी आरोग्य केंद्रांचा सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट आशांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी मा.पालकमंत्री महोदयांनी महानगरपालिकेतील अमरावती मनपा सर्वसाधारण कामकाज, प्रधानमंत्री आवास योजना, पाणी योजना प्रगती पुरवठा, भुयारी गटार, घनकचरा व्यवस्थापन योजना, स्वच्छता सेवा नियोजन, मनपा निधी बाबत, मनपा कार्यान्वित अन्य प्रकल्प व उपक्रम, आयात्यावेळचे विषय या विविध विषयांवर चर्चा करुन माहिती जाणून घेतली. सदर विषय त्वरीत मार्गी लावावा असे यावेळी मा.पालकमंत्री महोदयांनी सांगितले. संबंधीतांशी समन्वय साधून येणा-या अडचणी त्वरीत सोडवूण सदर कामाला युध्दस्तरावर गती देण्यात यावी. अमरावती शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या सुचना यावेळी त्यांनी दिल्या. आयुक्त सचिन कलंत्रे यांनी महानगरपालिकेच्या कामकाजाची संपुर्ण माहिती यावेळी मा.पालकमंत्री महोदयांना दिली.
या बैठकीत मा.पालकमंत्री महोदयांनी प्रधानमंत्री आवास योजनेला अधिक गतिमान करण्याचे निर्देश दिले. ज्या तांत्रिक अडचणी येत आहे त्या त्वरीत दूर करुन लाभार्थ्यांना त्वरीत मदत करावी. या विभागाचे कामकाज सुरळीत सुरु असून या विभागाने युध्द स्तरावर कार्यवाही करुन नागरीकांना त्यांचे हक्काचे घर उपलब्ध करुन द्यावे.
या बैठकीत मा.पालकमंत्री महोदयांनी अकोली घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा सुरु असलेल्या कामाचा सविस्तर आढावा घेतला तसेच कंत्राटदार कशा पध्दतीने काम करणार हे समजून घेतले. तसेच कामाचे स्वरुप पाहता, कामाचा वेग वाढवून त्यांनी सदर कामाला गती देण्याच्या सुचना यावेळी दिल्या. सदर काम पुर्ण क्षमतेसह त्वरीत कार्यान्वित करण्यात यावे. अमरावती शहरासाठी हा महत्वाचा प्रकल्प असून प्रशासनाने सदर प्रकल्प व्यवस्थितरित्या हाताळावा. या प्रकल्पात काम करणा-या प्रत्येक यंत्रणेने समन्वय ठेवून कार्य करावे अश्या स्पष्ट सुचना कंत्राटदार व अधिका-यांना दिल्या.
सदर बैठकीत अमरावती शहरातील भुयारी गटार योजना बाबत यापुढे मनपाने समन्वय साधून ही योजना पुर्णत्वास नेण्याबाबत आदेशित केले.
अमरावती पाणी पुरवठा योजने संदर्भात त्यांनी संपुर्ण आढावा घेतला. या विभागाने शासनस्तरावरुन पाठपुरावा करण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. या योजनेसाठी येणा-या काळात भरीव प्रयत्न केल्या जातील असेही यावेळी त्यांनी सांगीतले.
या बैठकीत आमदार रवि राणा, आमदार सौ.सुलभाताई खोडके, आमदार प्रताप अडसड, माजी पालकमंत्री प्रविण पोटे, महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त डॉ.मेघना वासनकर, उपायुक्त नरेंद्र वानखडे, मनपा अधिकारी उपस्थित होते.