घरगुती वादातून पती जीवावर उठला, पत्नीला कोल्ड्रिंकमधून पाजलं विष, छत्रपती संभाजीनगरात खळबळ

कौटुंबिक न्यायलयात दाखल केलेला खटला मागे घेण्याची धमकी देत विवाहितेला विषारी औषध पाजण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना १८ फेब्रुवारीला रात्री साडेआठला नारेगाव येथील भारत काट्याजवळ घडली. या प्रकरणात विष पाजणाऱ्या शेख मोईन शेख चाँद (वय ४०, रा. अंबड जि. जालना), रईस बेग अमीन बेग (वय ३०) आणि नाजेरा (वय ३२) या तिघांच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात शहिस्ता मोईन शेख (वय ३२, रा. अजिज कॉलनी, नारेगाव) यांनी तक्रार दिली. शहिस्ता व शेख मोईन यांचे लग्न झालेले असून, त्यांच्यात वाद असल्याने ते विभक्त राहतात. शाहिस्ता यांनी कौटुंबिक न्यायलयात पती व त्याच्या नातेवाइकाविरोधात याचिका दाखल केलेली आहे.
शाहिस्ता शेख या १८ फेब्रुवारी रोजी रात्री घरी असताना शेख माईन, रईस बेग आणि नाजेरा हे तिघे विवाहितेला भेटण्यासाठी आले. या तिघांनी शाहिस्ता शेख हिला भेटण्यासाठी नारेगावातील भारत काटा येथे बोलावले. त्यानुसार, शाहिस्ता तेथे गेली असता तिघांनी तिला कौटुंबिक न्यायलयात टाकलेली केस परत घे, तुला सोडचिठ्ठी देतो असे सांगितले. यानंतर कोल्ड्रींकच्या बाटलीत विषारी औषध टाकून शाहिस्ता हिला पिण्यासाठी दिले. शाहिस्ता हिला कोल्ड्रींक प्यायल्यानंतर चक्कर आली. हे पाहून तिघे पळून गेले. या प्रकरणात मोईन शेख याच्यासह अन्य दोन जणांच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक मुंडे करीत आहेत.