टीम इंडियाने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली, सचिन तेंडुलकरकडून ‘या’ खेळाडूंना विजयाचं श्रेय

चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियाच्या शिलेदारांनी पाकिस्तानचा पराभव करत दुसऱ्या विजयाची नोंद केली. या सामन्यामध्ये पाकिस्तानने पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी २४१ वर ऑल आऊट केलं होतं. त्यानंतर विराट कोहलीचे दमदार शतक आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने ने ४५ चेंडू आणि ६ विकेट राखून विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह पाकिस्तानला पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धेमध्ये धूळ चारली. या विजयानंतर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने टीम इंडियाचं अभिनंदन करताना एक खास पोस्ट केली आहे.
सचिन तेंडुलकर काय म्हणाला?
बहुप्रतीक्षित सामन्याचा परिपूर्ण शेवट. खरा नॉकआउट! विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांची सुपर खेळी त्यासोबतच गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली, खास करून कुलदीप यादव आणि हार्दिक पंड्या, असं सचिन तेंडुलकर याने पोस्ट करत म्हटलं आहे. या सामन्यामध्ये विराट कोहली याने १११ चेंडूत १०० धावा केल्या यामध्ये त्याने ७ चौकार मारले. श्रेयस अय्यर ५६ धावा आणि शुभमन गिल ४६ धावा केल्या. तर बॉलिंगमध्ये हार्दिक पंड्याने दोन तर कुलदीप यादवने तीन विकेट घेतल्या होत्या. स्टार खेळाडू मोहम्मद शमी याची पाटी मात्र कोरी राहिल्याचं पाहायला मिळालं. विराट कोहलीने आपल्या वनडे करियरमधील ५१ व्या शतकाला गवसणी घातली.
विराट कोहलीने या सामन्यात शतक करत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. विराटने वन डे मध्ये १४ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. विराट कोहली हा एकमेक खेळाडू ज्याने आयसीसीच्या वर्ल्ड कप, चॅम्पियन ट्रॉफी आणि आशिया कपमध्ये पाकिस्तानविरूद्ध शतक केलं आहे. विराट प्रत्येकवेळी पाकिस्तानसाठी काळ ठरला असून त्याच्या शतकी खेळीने टीम इंडियाने सहजपणे सामना जिंकला.
दरम्यान, टीम इंडियाने बांगलादेशला पहिल्या सामन्यात ६ विकेट राखून पराभूत केले होते. तर पाकिस्तानविरूद्धही सहा विकेटने विजय मिळवला आहे. दोन विजयांसह टीम इंडियाचे उपांत्य फेरीमधील स्थान निश्चित झालं आहे. तर तिसरा सामना न्यूझीलंडविरूद्ध असणार आहे