नवी दिल्लीत मराठीजनांसाठी स्वतंत्र भव्य वास्तू – उपमुख्यमंत्री पवार

मराठीला अभिजात वैभव प्राप्त करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही देताना नवी दिल्लीत मराठीजनांसाठी स्वतंत्र भव्य वास्तू उभारण्यात येईल, अशी घोषणा करून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या भव्य संस्कृतीला साजेशा अशा या वास्तूसाठी आगामी अर्थसंकल्पात शासन पुरेसा निधी उपलब्ध करून देईल. राज्य शासन अतिशय चांगल्या भावनेने सांस्कृतिक उपक्रमांसाठी मदत करत असते ही बाब लक्षात ठेऊन साहित्यिकांनी स्वाभिमानाने साहित्यनिर्मिती करावी. महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे सक्तीचे करण्यात आले आहे. याबाबत काही उणीवा असतील तर त्याचा पुन्हा आढावा घेतला जाईल. मराठी ज्ञानभाषा व्हावी, मराठीची उपयुक्तता वाढावी, ती बहुजात आणि बहुज्ञात व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे. मराठी भाषेला अभिजात वैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, प्रसारासाठी शासन निधी कमी पडू देणार नाही, तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या मराठी भाषिकांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहील, असेही श्री पवार यांनी सांगितले.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणाऱ्या पहिल्याच अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे आभार मानले. विठ्ठल भक्तांचा मेळा दरवर्षी पंढरीत जमतो. त्याचप्रमाणे, संमेलनाच्या निमित्ताने दरवर्षी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी साहित्यिकांचा मेळा साहित्य पंढरी निर्माण करतो. भक्तिभाव, समाधान आणि नवीन ऊर्जा या दोन्ही पंढरीचे विशेष गुणधर्म असून साहित्य संमेलनातून मिळणाऱ्या उर्जेतून नवे साहित्य निर्माण व्हावे. साहित्यिकांच्या लेखणीत समाजाला जागृत करण्याची, योग्य दिशा देण्याची क्षमता असते. तिचा वापर सकारात्मक बदलासाठी व्हावा. नवोदित लेखकांना गुणवत्तेनुसार संधी देण्याची भूमिका प्रथितयश साहित्यिकांनी घ्यावी. तसेच साहित्य संमेलनात विविध क्षेत्रातील मराठी भाषिक तरुणांचा सहभाग वाढायला हवा, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केली.
सध्या छावा चित्रपटाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास युवा पिढी समोर आला आहे. छत्रपती संभाजी महाराज साहित्यिकही होते. तुळापुर, वडूला त्यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रज अध्यासन लवकरच सुरू होत असल्याची माहिती देऊन मराठी भाषा मंत्री उदय सामंत म्हणाले, साहित्याचा खरा संस्कार या संमेलनाच्या माध्यमातून होत आहे. या संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले चाकावरचे साहित्य संमेलन हा अनोखा उपक्रम असून यापुढे होणाऱ्या साहित्य संमेलनानिमित्त अशा यात्री संमेलनाचे नियमित आयोजन व्हावे. त्यास शासनाकडून मदत केली जाईल. मराठी भाषेचा मंत्री म्हणून या विभागाचा कार्यभार सांभाळताना आपण विविध उपक्रमांच्या माध्यमातून मराठीच्या विकासासाठी निष्ठेने प्रयत्न केल्याचे त्यांनी यावेळी आर्वजून सांगितले. देशाच्या राजधानीत मराठीचा जल्लोष होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करून श्री दर्डा म्हणाले, मराठी वाचन संस्कृती जगवण्यासाठी व्यापक प्रयत्न करावे. लोकांची वाचनाची आवड भागविण्यासाठी ग्रंथ विक्रीस प्रोत्साहन द्यावे. नव्या पिढीकडून मातृभाषेचा वापर वाढवण्यासाठी शिक्षणात मराठीचा आग्रहाने अंर्तभाव करणे आवश्यक आहे.
मराठी शाळांच्या सुधारणांसाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करून संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, भाषा ही संस्कृतीची वाहक असते. तिची निगा राखणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. चांगले ठराव झाले. ते प्रत्यक्ष आले पाहिजेत. सीमा भागात त्या त्या भाषिकांची संख्या लक्षात घेऊन द्वैभाषिक शाळा सुरू झाल्या पाहिजेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत दुय्यम स्तरावरची मराठी शिकवली जाते. त्यात सुधारणा व्हावी. परदेशी भाषांप्रमाणेच भारतातील इतर भाषा शिकण्याची सोय हवी. शासनाने त्यासाठी कृतिशील पावले उचलावीत. मराठी भाषा वाढण्यासाठी घराघरातील मुले मराठीत शिकली पाहिजेत याची सर्वांनी काळजी घ्यावी. ज्ञान क्षेत्र जर समृद्ध करायचे असेल तर ज्ञानाप्रती तळमळ, आस पाहिजे. तसा समाज ज्ञानसंपन्न होतो. सीमा प्रदेशात संस्कृतीचे अभिसरण घडत असते. ‘भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे’ ही संत ज्ञानेश्वरांची उक्ती आत्मसात करत आपण स्नेह, प्रेम वाढवूया, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावपूर्ण भाषणाचा समारोप केला.
रिद्धपूर येथे स्थापित मराठी विद्यापीठात नियमित कामकाज तातडीने सुरू व्हावे, त्यासाठी मनुष्यबळ व आर्थिक तरतूद व्हावी, बृहनमहाराष्ट्रातील संस्थांना आर्थिक पाठबळ द्यावे, बोलीभाषांच्या संवर्धनासाठी बोलीभाषा विकास अकादमी स्थापन करावी आदी 12 ठराव यावेळी करण्यात आले.