पेपरफुटी प्रकरणाने घेतला युटर्न, केंद्रसंचालकाला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा होतोय आरोप

“दहावीच्या परिक्षेचा पहिलाच दिवस आणि मराठीचा पेपर लीक! महागाव तालुक्यातील कोठारी परीक्षा केंद्रावर घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून, मुख्य सूत्रधार अमोल राठोड याला अटक करण्यात आली आहे. पण या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळत असून केंद्र संचालकाला नियोजनबद्ध पद्धतीने वाचवले जात असल्याचा आरोप होतोय. काय आहे नेमका संपूर्ण प्रकार? पाहूया ही सविस्तर रिपोर्ट…”

बातमीचा सारांश:
महागाव तालुक्यातील कोठारी येथील परीक्षा केंद्रावर पहिल्याच दिवशी दहावीचा मराठी पेपर लिक झाल्याची माहिती मिळताच प्रशासन खडबडून जागे झाले होते. परीक्षा सुरु होण्याआधीच पेपर व्हाट्स अॅपवर व्हायरल झाला. गावातीलच एकाने हा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल केला होता. त्याचा मोबाईल क्रमांक पोलिसांनी शनिवारी ट्रेस केला. अमोल बळीराम राठोड हा कोठारी येथील रहिवासी आहे. त्याची पुतणी इयत्ता दहावीची परीक्षा देत आहे. तिला सोडायला तो परीक्षा केंद्रावर आला होता. परीक्षा सुरू झाल्यानंतर पाणी पिण्याच्या बहाण्याने तो सर्वांची नजर चुकवून मुख्याध्यापक तथा केंद्र संचालकाच्या कक्षात शिरला. ऑफिसच्या बाजूला पार्टिशन करून तयार करण्यात आलेल्या खोलीत त्याला चार प्रश्नपत्रिका पडून असल्याचे आढळून आले. त्याने कॉपी पुरविण्याच्या उद्देशाने लगेच आपल्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचा फोटो काढला आणि त्याचा मित्र गोपाल मधुकर जाधव याच्या मोबाईलवर पाठविला. गोपालने नंतर ती प्रश्नपत्रिका समाज माध्यमावर व्हायरल केल्याचा खुलासा झाला आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधार अमोल बळीराम राठोड यास पोलिसांनी ताब्यात घेतले. महाराष्ट्र विद्यापीठाच्या, मंडळाच्या व इतर विनीर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकरांना आळा घालणे १९८२ कलम ५ आणि ६ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

क्लोजिंग अँकर:
“कोठारी येथील पेपर लीक प्रकरणाने शिक्षण व्यवस्थेतील सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी, केंद्र संचालकाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह कायम आहे. यापुढे अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलणार? आणि या प्रकरणाचा पुढील तपास कोणत्या दिशेने जाईल? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. पुढील अपडेट्ससाठी आमच्यासोबत राहा!