AmravatiLatest News
शीतली थापा यांना 2 लाख नुकसान भरपाई – मानवधिकार आयोगाचा आदेश

न्याय मिळायला वेळ लागतो, पण जेव्हा तो मिळतो तेव्हा अन्यायग्रस्तांना मोठा दिलासा मिळतो. अशीच एक घटना अमरावतीत घडली होती, जिथे नेपाळच्या शीतली थापा यांना चोरीच्या खोट्या आरोपात पोलिसांनी अमानुष मारहाण केली. मात्र, आता त्यांना मानवाधिकार आयोगाने न्याय दिला असून, दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.
गेल्या वर्षी अमरावतीतील गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेत शीतली थापा या नेपाळी महिला घरकाम करत असताना त्यांच्यावर चोरीचा खोटा आरोप लावण्यात आला. घरमालकाने थेट पोलिसांना माहिती दिली, आणि गाडगे नगर पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता त्यांना आरोपीप्रमाणे वागवले. त्यांच्यावर थर्ड डिग्रीचा वापर करून अमानुषपणे मारहाण करण्यात आली.
ही घटना सर्वप्रथम सिटी न्यूजने प्रकाशझोतात आणली. त्यानंतर या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात दखल घेत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी त्वरीत चौकशीचे आदेश दिले. तपासानंतर गाडगे नगर पोलिसांनी चुकीची वागणूक दिल्याचे स्पष्ट होताच संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक मुख्यालयात अटॅच करण्यात आले, तर मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्यात आले.
मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत शीतली थापा यांना 2 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे. मात्र, त्यांच्याकडे बँक खाते नसल्याने पोलिसांनी थेट रोख रक्कम सुपूर्त करण्याचा निर्णय घेतला. दोन ते तीन दिवसांत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते नुकसानभरपाई दिली जाणार आहे.
या संपूर्ण घटनाक्रमामुळे शीतली थापा व त्यांच्या पतीच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असून, त्यांनी सिटी न्यूज व पोलीस आयुक्त रेड्डी यांचे आभार मानले आहेत. सिटी न्यूजने हा अन्याय समोर आणल्यानेच न्याय मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
"शीतली थापा यांना अखेर न्याय मिळाल्याने त्यांच्यासह त्यांच्या पतीच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य दिसत आहे. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी तत्परता दाखवत हे प्रकरण गांभीर्याने घेतल्यामुळेच ही कार्यवाही वेगाने पूर्ण झाली. तसेच, सिटी न्यूजने या प्रकरणाला वाचा फोडून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिला. या घटनेनंतर पोलिसांनी आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करणे गरजेचे आहे, अन्यथा असे अन्याय पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.