स्वराज्य, रयत आणि विकास हे छत्रपतीचे ध्येय – डॉ. गोविंद तिरमनवार

छत्रपती शिवाजी महाराज हे खया अर्थाने रयतेचे राजे होते. रयत आणि तिचा विकास हे त्यांचे ध्येय होते. यातूनच त्यांनी स्वराज्याची बांधणी केली. त्यासाठी सार्वजनिक जीवनाची व्यवस्था लावण्याचे मूलभूत कार्य छत्रपतींनी केले. एक उत्कृष्ट स्थापत्य, नियोजनकर्ता म्हणून, ‘आज्ञापत्र’ हे त्यांच्या विकास पर्वाची पावती आहे, असे प्रतिपादन डॉ.गोविंद तिरमनवार यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाअंतर्गत एम. ए. छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्यावतीने शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या प्रथम सत्रात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. विचारपीठावर अध्यक्षस्थानी डॉ. अंबादास घुले, प्रमुख अतिथी म्हणून प्रा. राजेंद्र पांडे उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, शिवाजी महाराजांनी आपल्या अधिनस्त प्रत्येक गडावर अतिशय तंत्रबद्ध पाण्याचे नियोजन केले. स्वच्छतेसंदर्भात अतिशय जागरूक असणाया राजाने पाण्याचे व्यवस्थापन करताना तलाव निर्मिती, कुपनलिका, मलनि:स्सारण व्यवस्था, पर्यावरण, वृक्ष लागवड यासाठीचे कार्य, यावरून शिवछत्रपती किती जागृत होते हे लक्षात येते.
प्रमुख अतिथी प्रा. राजेंद्र पांडे यांनीही शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान इतिहासाला उपस्थितांसमोर मांडले.
डॉ. अंबादास घुले यांनी अध्यक्षीय भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, विचार आणि व्यवस्थापन हे आजच्या तरुण पिढीसमोर आदर्श असले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह करताना तो रायगडाच्या पायथ्याशी का केला? ज्या राजाने रयतेचा विचार केला तो राजा महान वाटतो म्हणून डॉ. बाबासाहेबांनी जिजाऊ, शिवाजींचा जयघोष करुन चवदार तळ्याचा सत्याग्रह केला असेही त्यांनी सांगितले. संचालन प्रा.वैभव जिसकार, तर आभार प्रा. मनोज वाहाणे यांनी मांनले. कार्यशाळेला विद्यापीठाच्या सर्वच विभागातील विद्यार्थी, प्राध्यापक तसेच अभ्यासक उपस्थित होते.