कुटुंबावर हल्ला करुन सव्वा सहा लाखांच्या दागिन्यांसह रोख रक्कम लुटली, सशस्त्र दरोड्याने पुण्यात खळबळ

पुणे : खेड तालुक्यातील बहुळ परिसरात पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दरोडा टाकून सव्वा सहा लाखांचे दागिने आणि रोख रक्कम लुटली. कुटूंबातील सदस्यांनी या चोरीला प्रतिकार केला म्हणून दरोडेखोरांनी धारधार शस्त्रने त्यांच्यावर हल्ला केला. यात दोघेजण गंभीर जखमी झाले असून, हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले आहेत. या हल्ल्यात शालन जयराम वाडेकर (वय ६५), अशोक जयराम वाडेकर (वय ३५) व उज्वला अशोक वाडेकर (वय ३२, सर्व रा. बहुळ) जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि. २४ फेब्रुवारी ) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बहुळ गावच्या हद्दीतील फुल सुंदरवस्ती परिसरात घडली. याप्रकरणी जयराम लक्ष्मण वाडेकर (वय ६५) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
थरकाप उडवणारी घटना
याबाबत चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या घरात मध्यरात्री पाच – सहा चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून प्रवेश केला. त्यावेळी झोपेत असलेले फिर्यादी जयराम वाडेकर यांना अचानक पत्र्याच्या पेटीचा आवाज आल्याने जाग आली असता, २० ते २५ वयोगटातील जाडसर, सावळ्या वर्णाचा एक चोरटा हातात धारदार चाकू घेऊन त्यांच्याजवळ बसला होता. “गप्प राहा, नाहीतर चाकू भोसकतो!” अशी धमकी देत त्याने त्यांना जागेवरून हलण्यास मज्जाव केला. दरम्यान, इतर दोन चोरटे खोलीतील कपाटे आणि पेट्या फोडत होते. हॉलमध्ये झोपलेल्या शालन वाडेकर यांनी आवाज ऐकून घाबरत चोरट्यांना “काय घ्यायचे ते घ्या, पण आम्हाला मारू नका!” अशी विनवणी केली. मात्र, तरीही चोरट्यांनी हात उचलत त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावले.
पोटात थेट चाकू भोसकला
जयराम आणि शालन यांचा ऐवज काढून घेतल्यानंतर चोरटे शांत बसले नाहीत. त्यांनी अशोक आणि उज्वला यांच्या बेडरूमचा दरवाजा कटावणीच्या साहाय्याने तोडला. अचानक दरवाजा उघडल्याने अशोक आणि उज्वला जागे झाले. प्रतिकार करताच, चोरट्यांनी दोघांच्या पोटात थेट चाकू भोसकला, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दाम्पत्याने मदतीसाठी आरडाओरड केली. त्यावेळी शालन वाडेकर यांनी मुलाला व सूनेला वाचवण्यासाठी धाव घेतली, मात्र, चोरट्यांपैकी एकाने त्यांना काठीने मारहाण केली. चोरट्यांनी एक लाख वीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि १२ हजार रुपये रोख रक्कम लंपास केली आहे. हल्ल्यानंतर चोरट्यांनी घराची बाहेरून कडी लावून पळ काढला.
ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. घटनास्थळी आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चाकण पोलीसांनी भेट घेऊन पाहणी केली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे निरीक्षक नाथा घार्गे करत आहेत.