त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीचा ‘शिवस्तुती नृत्याविष्कार’ कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात; सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, माजी विश्वस्तांकडून आक्षेप

महाशिवरात्रीनिमित्त देशभरात कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. अशातच नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्येही महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. महाशिवरात्रीला संध्याकाळी मंदिराच्या प्रांगणात मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगणा प्राजक्ता माळीहिच्या ‘शिवस्तुती नृत्याविष्कार’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. पण, आता याच कार्यक्रमावरुन वादाला तोंड फुटल्याचं दिसत आहे. महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध होत आहे. सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, असं पत्र मंदीर समितीचे माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांना लिहिलं आहे.
देशभरातील बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये महाशिवरात्री निमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन दरवर्षी केलं जातं. अशातच यंदा महाशिवरात्रीनिमित्त मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या ‘शिवस्तुती नृत्याविष्कार’ कार्यक्रम देवस्थान ट्रस्टनं आयोजित केला आहे. पण, या कार्यक्रमावर मात्र, माजी विश्वस्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, यासंदर्भात ग्रामीण पोलिसांत एक पत्र देखील दिलं आहे.
सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, चुकीचा पायंडा पाडू नये, मंदिरातील धार्मिक वातावरण बिघडू नये अशी आमची इच्छा, अशी मागणी करणारं पत्र माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांना लिहिलं आहे.
सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही : माजी विश्वस्त
माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी यासंदर्भात एबीपी माझाला यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, “अतिशय पवित्र दिवस आहे हा महाशिवरात्रीचा. त्यामुळे इथे धार्मिकच कार्यक्रम आयोजित झाले पाहिजे. जरी, प्राजक्ता माळी तिथे ‘शिवस्तुती नृत्याविष्कार’ सादर करणार असेल, तरीदेखील याचा इथे पुर्नविचार झाला पाहिजे. मी स्वतः माजी विश्वस्त आहे, शास्त्रीय नृत्य ठेवलं पाहिजे, कथ्थक नृत्य ठेवलं पाहिजे, पण सेलिब्रिटींना आणून त्रंबकेश्वरमध्ये एक वेगळाच पायंडा त्रंबकेश्वर देवस्थानाच्या ट्रस्टनं सुरू केला आहे. जे अत्यंत चुकीचं घडत आहे, त्यामुळे हे थांबलं पाहिजे आणि तात्काळ यामध्ये बदल झाला पाहिजे…”
दरम्यान, महाशिवरात्री निमित्त मंदिर विश्वस्तांच्या वतीनं मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या ‘शिवस्तुती नृत्याविष्कार’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आता माजी विश्वतांनी या कार्यक्रमावर आक्षेप घेतल्यामुळे प्राजक्ता माळीचा कार्यक्रम रद्द होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.