दुर्दैवी! परीक्षेपूर्वीच कापली गेली आयुष्याची दोरी, नाशिकमधील दहावीच्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू

नाशिक: इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुसाट दुचाकी चालविल्याने झालेल्या अपघातात करुण अंत झाला. ही घटना इंदिरानगर रस्त्यावर घडली. वेदांत विशाल गुरसळकर (वय १६, रा. वज्रभूमी रो-हाऊस, वडाळा-पाथर्डी रस्ता) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. दुचाकी थेट रस्त्यालगत असलेल्या पाणीपुरीच्या गाडीवर आदळल्याने तेथील पत्रा गळ्यात शिरल्याने जखमी वेदांतचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
वेदांत हा शुक्रवारी (दि. २१) सायंकाळी साडेपाच वाजता पाथर्डी गावाकडून इंदिरानगरकडे त्याच्या दुचाकीवरून जात होता. त्यावेळी नियंत्रण सुटल्याने त्याची दुचाकी थेट शेजारी उभ्या असलेल्या पाणीपुरीच्या गाडीवर धडकली. पाणीपुरीच्या गाडीचा पत्रा वेदांतच्या गळ्याला लागल्याने, तो रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. नागरिकांसह त्याची आजी ललिता यांनी त्याला जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. शनिवारी (दि. २३) उपचारादरम्यान मात्र वेदांतचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर इंदिरानगर पोलिसांनी रुग्णालयात जात अकस्मात मृत्यूची नोंद केली.
दरम्यान, वेदांतचे वडील राज्य परिवहन महामंडळात वाहक पदावर कार्यरत असून, आई गृहिणी आहे. त्याला एक लहान भाऊ आहे. दरम्यान, वेदांत हा अल्पवयीन असून त्याच्याकडे वाहन चालविण्याचा पक्का परवाना नसताना सुसाट दुचाकी चालविल्याने त्याचा अपघात झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे हादेखील गुन्हा आहे. सध्या शालेय परीक्षा सुरू असल्याने अल्पवयील मुलांना वाहने देण्याकडे पालकांचा कल दिसून येत आहे. मात्र पालकांची ही बेपर्वाई जीवावर बेतत आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस पुढील तपास करीत असून, इतर पालकांनी या घटनेतून सजग होण्याची अपेक्षा सुज्ञ नाशिककरांनी व्यक्त केली आहे.