भातकुलीत आधार अपडेटसाठी नागरिकांची गर्दी, अपंग व निराधार लाभार्थ्यांना अडचण
भातकुली तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आधार अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेसाठी नागरिकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. हजारो लाभार्थ्यांचे आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्यांशी लिंक नसल्याने फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आधार अपडेट करावा, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे.
भातकुली तहसील कार्यालयात सकाळपासूनच मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होत आहे. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेचे हजारो लाभार्थी आहेत, ज्यांना थेट डीबीटी प्रणालीद्वारे त्यांच्या खात्यात पेमेंट मिळते. मात्र, आधार अपडेट नसल्यानं अनेकांना पेमेंट मिळण्यात अडथळे येऊ शकतात.
याआधीही तलाठी आणि तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना आधार अपडेट करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. तरीही तीन हजारांहून अधिक लाभार्थ्यांचे आधार क्रमांक त्यांच्या मोबाईल नंबरशी लिंक नसल्याने ते वेळेवर अपडेट करू शकले नाहीत. यामुळे तहसील कार्यालयात एकाच वेळी मोठी गर्दी उसळली असून, नागरिकांना मोठ्या प्रतीक्षेला सामोरे जावे लागत आहे.
भातकुली तहसील कार्यालयात आधार अपडेट करण्यासाठी झालेल्या या गर्दीमुळे अपंग आणि निराधार लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने यासाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे, जेणेकरून वृद्ध आणि अपंग लाभार्थ्यांना सहज सेवा मिळू शकेल. आता पुढील काही दिवस ही प्रक्रिया सुरळीत चालते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.