अमरावतीतील दर्यापूर तालुक्यात सरपंचावर प्राणघातक हल्ला!

अमरावती , दर्यापूर :- बातमी आहे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील उपराई गावातील, जिथे सरपंच नीरज नागे यांच्यावर रात्री उशिरा प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांचा उद्देश काय होता? पोलिसांनी आधीच तक्रार मिळाल्यानंतरही का दुर्लक्ष केले?
अमरावती जिल्ह्यातील उपराई गावात नीरज नागे हे मागील दोन वर्षांपासून सरपंच म्हणून कार्यरत आहेत. मात्र, घरकुल यादीत काही लाभार्थ्यांची नावे नसल्याने आणि ग्रामपंचायत कार्यालयात हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावल्याने त्यांच्यावर सातत्याने दबाव आणला जात होता.
मंगळवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास, सरपंच नागे हे जेवणानंतर आपल्या मित्रासोबत घराबाहेर असताना अचानक 10 ते 15 जणांनी त्यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावतीला हलवण्यात आले आहे.
गंभीर बाब म्हणजे, काही दिवसांपासून सरपंच नागे यांना वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. त्यांनी पोलिसांकडे संरक्षणासाठी तक्रार देखील दाखल केली होती, मात्र पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप होत आहेत.
या घटनेनंतर हिंदू संघटनांनी संताप व्यक्त केला असून, आरोपींना तातडीने अटक झाली नाही तर उपराई येथे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. आता पोलिस प्रशासन यावर काय पाऊल उचलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरपंचावर झालेल्या या हल्ल्यामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याने लोकांमध्ये संताप वाढत आहे. आरोपींवर कारवाई होणार का? हिंदू संघटनांचे आंदोलन किती तीव्र होईल?