तब्बल एका महिन्यानंतर पीसी वाघिणीच्या गळ्यातील फास काढण्यात वन विभागाला यश!
यवतमाळ :- यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात एका वाघिणीच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. तब्बल एका महिन्यानंतर वन विभागाच्या अथक प्रयत्नानंतर त्या वाघिणीच्या गळ्यातील तारेचा फास अखेर काढण्यात यश आले आहे. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण.
यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात पीसी वाघिणीच्या गळ्यात तारेचा फास अडकला होता. वन विभागाच्या सततच्या प्रयत्नानंतर अखेर 25 फेब्रुवारी रोजी वाघिणीला डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आले. अमरावती (प्रा.) वन विभागाच्या शीघ्र बचाव दलाने आणि डॉ. रणजीत नाळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली. पुढील औषधोपचारानंतर वाघिणीला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात येणार आहे.
वन्यजीव संरक्षणाच्या दिशेने वन विभागाने मोठे यश मिळवले आहे. एका महिन्यानंतर वाघिणीच्या जीवाला असलेला धोका दूर करण्यात आला. आता वाघिणीला अभयारण्यात पुन्हा सोडले जाईल, त्यामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.