नागपुरात क्रिकेट सट्टा अड्ड्यावर पोलिसांचा छापा, नेपाळी नागरिकासह सहा जण अटकेत!

नागपुरा :- सोमलवाडा येथील शिल्पा सोसायटीत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सट्टा अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत छापा टाकला.
या छाप्यात पोलिसांनी नेपाळी नागरिकासह सहा सट्टेबाजांना अटक केली असून, लाखोंचा ऐवज जप्त केला आहे.या गोरखधंद्यात आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिसांनी याप्रकरणात ऑनलाइन सट्टेबाजी प्लॅटफॉर्मच्या आयडी धारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सट्ट्याच्या जाळ्यात अडकलेले गुन्हेगार कोण? आणि हा रॅकेट किती मोठा आहे?
बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सोमलवाडा येथील शिल्पा सोसायटीत क्रिकेटवर सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या उपायुक्त राहुल माकणीकर यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ४ चे निरीक्षक कमलाकर गड्डीमे आणि त्यांच्या टीमने सोमवारी सायंकाळी धडक कारवाई केली.आरोपी दिनेश लोकचंद वर्धानी याने काही दिवसांपूर्वी घर भाड्याने घेतले होते. घरमालकाला सांगितले की, त्याचा मुलगा नागपुरात अभियांत्रिकी शिक्षण घेत आहे आणि तो आणि त्याचे मित्र अभ्यासासाठी राहणार आहेत. त्यामुळे घरमालकाने कोणताही संशय घेतला नाही. मात्र, हे सहा जण सतत लॅपटॉपवर काम करत असल्याने ते अभ्यास करत असल्याचा समज झाला. पण प्रत्यक्षात हा अभ्यास नव्हता, तर क्रिकेट सट्ट्याचा डाव मांडला जात होता!
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करत नेपाळी नागरिकासह सहा जणांना अटक केली असून, आरोपींची नावे
१ दिनेश लोकचंद वर्धानी (वय ४२)
२ जयशंकर नंदकिशोर सिंग (वय २६)
३ सन्नी अनिलकुमार जसवानी (वय २४)
४ विशाल कन्हय्यालाल बनवारी (वय २१)
५ तनुला अमृतलाल गुरुवानी (वय २९)
६ गिरीराज पीतबहादूर खन्ना (वय ३२), नेपाळ अशी आहेत. हे आरोपी शिबोवर नावाच्या ऑनलाइन अॅपवरून चॅम्पियन्स ट्रॉफीमधील क्रिकेट सामन्यावर सट्ट्याची खायवाडी करत होते.
या माध्यमातून हजारो लोकांना सट्ट्याच्या जाळ्यात ओढले जात होते.या छाप्यात पोलिसांनी ३५ मोबाईल, ४ लॅपटॉप, तसेच ७.६० लाख रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. तसेच, शोबी ऑनलाइनच्या आयडी धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपुरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सट्टा सुरू असताना पोलिसांना इतका उशीर का लागला?
सट्टेबाजीसाठी वापरले जाणारे ऑनलाइन प्लॅटफॉर्म कोण चालवते आणि त्यांच्या विरोधात कठोर कारवाई कधी होणार?
आरोपींमध्ये नेपाळी नागरिक सापडल्याने यात आंतरराष्ट्रीय रॅकेटचा हात असल्याचा संशय, त्याचा तपास कसा होणार?
ऑनलाइन सट्टेबाजी वाढत असताना सरकार आणि सायबर पोलिस यावर काय नियंत्रण ठेवणार?
क्रिकेट सट्टा हा केवळ नागपूरपुरता मर्यादित आहे का, की संपूर्ण महाराष्ट्रात मोठं नेटवर्क आहे?
नागपुरात क्रिकेट सट्ट्याचा मोठा अड्डा फोडण्यात आला असून, यात नेपाळी नागरिकाचा समावेश असल्याने हे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं प्रकरण आहे. पोलिसांचा पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे. पण मोठा प्रश्न आहे – हे केवळ एक प्रकरण आहे की, महाराष्ट्रभर क्रिकेट सट्ट्याचं मोठं जाळं पसरलेलं आहे?