नागपुरात सुपारी तस्करीचा पर्दाफाश, पोलिसांची मोठी कारवाई

नागपुर :- नागपूर शहरात गुन्हे शाखेच्या युनीट ३ पथकाने मोठी कारवाई करत सुपारी तस्करीचा पर्दाफाश केला आहे. टेलीफोन एक्सचेंज चौकात संशयास्पदरित्या उभ्या असलेल्या एका तिनचाकी वाहनाची तपासणी केली असता, मोठ्या प्रमाणात सुपारी साठा आढळून आला. पोलिसांनी गाडी ताब्यात घेत आरोपींवर कारवाई केली आहे.
नागपूर शहरातील गुन्हे शाखा युनीट ३ च्या पथकाने टेलीफोन एक्सचेंज चौक येथे मोठी कारवाई करत एक थ्रीव्हीलर वाहन जप्त केले. ही कारवाई २५ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, एका संशयित लाल रंगाच्या तिनचाकी गाडीत मोठ्या प्रमाणात सुपारी साठवण्यात आलेली आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने टेलीफोन एक्सचेंज चौकाजवळ सापळा रचला आणि एम.एच. ४९ डी. ६३९१ अल्फा थ्रीव्हीलर गाडी ताब्यात घेतली. गाडीची तपासणी केली असता, त्यामध्ये २५ बोऱ्यांमध्ये भरलेली १२५० किलो सुपारी आढळली, ज्याची अंदाजे किंमत १,९०,००० रुपये असल्याचे समजले. तसेच, वाहनाची किंमत १,५०,००० रुपये असल्याने एकूण जप्त मुद्देमाल ३,४०,००० रुपये इतका आहे.
या प्रकरणात गाडी चालक सतीश भारत पाल, वय ३०, रा. यशोधरानगर, नागपूर याला ताब्यात घेण्यात आले असून, सुपारी मालक कमल डिंगंरा, रा. नेताजी नगर, नागपूर याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी जप्त केलेली सुपारी ही शरीरास अपायकारक आहे का? याबाबत तपास सुरू केला असून, अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. सद्यस्थितीत हा संपूर्ण मुद्देमाल लकडगंज पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उप-आयुक्त राहुल माकनिकर आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ. अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक अनिल ताकसाडे, पोउपनि मधुकर काठोके आणि त्यांच्या टीमने महत्त्वाची भूमिका बजावली.
नागपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठ्या प्रमाणात सुपारी तस्करी उघडकीस आली आहे. या प्रकरणात आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता असून, पोलिसांचा तपास सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अहवालानंतर पुढील कारवाई होईल. नागपूर पोलिसांनी अशा प्रकारच्या कारवाया सुरूच ठेवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.