भरधाव इलेक्ट्रिक बसने ६ लोकांना चिरडले, रस्त्यावर खळबळ

उत्तर प्रदेश :- उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यात बुधवारी दुपारी भीषण अपघाताची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील मसुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील मसुरी बस स्टँडजवळ इलेक्ट्रॉनिक बसने ६ जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. अपघाताच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. स्थानिक लोक आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलं. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर बस चालक फरार झाला आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, मसुरी स्टँडजवळ प्रवासी बसची वाट पाहत उभे होते. दुपारच्या वेळेस अचानक मेट्रो इलेक्ट्रॉनिक बस भरधाव वेगाने आली. त्यानंतर चालकाचं नियंत्रण गमालेल्या बसने ६ जणांना चिरडलं. भीषण अपघातात ६ प्रवासी गंभीर जखमी धाले आहेत. तर काही प्रवासी थोडक्यात बचावले. प्रवाशांची आरडाओरड केल्यानंतर लोक घटनास्थळी पोहोचले. लोकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. अपघाताची सूचना मिळाल्यानंतर पोलिसांनी ६ गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल केले.
अपघातानंतर बसचालक फरार झाला आहे. बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दररोज चालवणारा मेट्रो इलेक्ट्रिक बसचालक हा बस चालवत नव्हता. तर त्याऐवजी बसचा कंडक्टर हा बस चालवत होता. दुसऱ्या बससोबत शर्यत लावण्यात आल्यामुळे अपघात झाल्याचं बोललं जात आहे.