नागपुरात तरुणाला धाक दाखवून लुटले – टोळीच्या हल्ल्याने खळबळ

नागपूर :- नागपूरच्या पाचपावली परिसरात एका तरुणाला रस्त्यात अडवून धमकी देत जबरदस्त लुट करण्यात आली आहे.आरोपींनी चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील मौल्यवान वस्तू हिसकावल्या आणि बेदम मारहाण केली.या धक्कादायक घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
नागपूरच्या पाचपावली भागात २५ फेब्रुवारीच्या दुपारी एका तरुणाला जबरदस्त मारहाण करून लुटण्यात आले. फिर्यादी आपल्या दुचाकीने जात असताना यश डवला नावाच्या तरुणाने त्याला अडवले आणि मनिष पानठेला येथे नेले. तेथे जगदीश गोखले आणि त्याच्या साथीदारांनी त्याला धमकावले, पैसे मागितले आणि विरोध केल्यावर मारहाण केली.
यश डवला, जगदीश गोखले, बिट्टू चवरे आणि लक्की एडेचाल या टोळीने फिर्यादीला बळजबरीने कलकत्ता रेल्वे लाईनकडे नेले. त्याठिकाणी चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडील मोबाईल, बँक कार्ड्स आणि इतर मौल्यवान वस्तू काढून घेतल्या. एवढ्यावरच न थांबता त्यांनी दुचाकी आणि टूल किट बॅग देखील हिसकावून नेली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, आरोपींवर ३०९(६), ३(५) भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपुरात दिवसाढवळ्या गुन्हेगारी वाढत असून, या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे. नागपूरच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर असून, अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी पाहत राहा City News!