भजनासाठी निघालेल्या अर्टीगाचा भीषण अपघात, एक युवक ठार तर चार जण जखमी

नंदुरबार :- महाशिवरात्री निमित्त भजनासाठी पहाटे अर्टीगा गाडीत पाच युवक जात असताना नंदुरबार शहरातील वीर महाराणा प्रताप ते खोडाई देवी मंदिर रस्त्यावर भरधाव वेगातील आर्टिगा गाडी विद्युत खांबावर आदळल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. अपघातात चौघे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत आर्टिगा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाशिवरात्री निमित्त भजनाला निघालेल्या पाच जणांचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. हातातोंडाशी आलेला घास काळाने हिरावल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, तर परिसरात शोकाकुल वातावरण असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
काय झालं नेमकं?
नंदुरबार शहरातील गांधी नगर नजीकच्या मोईजनगरातील हितेश शांतीलाल ईशी हा हर्षल रवींद्र मराठे (वय १८) रा. कुंभारवाडा नंदुरबार, अविनाश युवराज देशमुख रा.बालआमराई, नितेश मनोज पवार रा.गांधीनगर, हितेश शांतीलाल ईशी रा. मोईजनगर नंदुरबार व रोशन संतोष नवसारे यांना आर्टिगा गाडीतून क्र. एमएच.३९-एजे. ७१५४ ने महाशिवरात्रीनिमित्त भजनासाठी शहरातील जगतापवाडी परिसरात असलेल्या डूबकेश्वर महादेव मंदिरावर जाण्यासाठी घेऊन जात असताना, नंदुरबार शहरातील वीर महाराणा प्रताप पुतळा ते खोडाई देवी मंदिर रस्त्याने भरधाव वेगाने गाडी चालवीत होता. त्याचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने खोडाई देवी चौकानजीकच्या विद्युत खांबावर गाडी धडकली.
या अपघातात गाडीतील वरील सर्वजण जखमी झाले. हा अपघात बुधवारी चार वाजेच्या सुमारास घडला. मोठा आवाज झाल्याने मंदिर परिसरात राहणाऱ्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघातात गंभीर जखमी झालेल्या हर्षल रवींद्र मराठे याचा मृत्यू झाला. या प्रकरणी रोशन संतोष नवसारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आर्टिगा चालक हितेश शांतीलाल ईशी याच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली. घटनेचा तपास सपोनि. विनोदकुमार गोसावी करीत आहेत.