LIVE STREAM

India NewsLatest NewsMaharashtra

वेल्श सरकारच्या गुंतवणुकीच्या स्वारस्याचे महाराष्ट्रात स्वागत

मुंबई :- महाराष्ट्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे आणि नाविन्यपूर्ण शक्तीचे केंद्र आहे. येथे भागीदारीसाठी मोठी संधी आहे. वेल्श सरकारच्या तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा, शिक्षण यांसारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी असलेल्या स्वारस्याचे महाराष्ट्र स्वागत करीत असून वेल्शसोबतचे संबंध दृढ करण्यासाठी महाराष्ट्र वचनबद्ध आहे, अशा शब्दात राजशिष्टाचार तथा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी वेल्श सरकारच्या सेंट डेव्हीड डे (वेल्श नॅशनल डे) निमित्त शुभेच्छा दिल्या.

सेंट डेव्हीड डे निमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात वेल्श सरकारला शुभेच्छा देताना श्री.रावल बोलत होते. वेल्श सरकारचे कॅबिनेट सचिव जेरेमी माइल्स, वेल्श सरकारचे भारतातील प्रमुख मिचेल ठाकर आदी यावेळी उपस्थित होते.

राजशिष्टाचार मंत्री रावल म्हणाले, सेंट डेव्हिड डे हा सेवा, समर्पण आणि समुदायाच्या चीरस्थायी मूल्यांचे प्रतीक आहे. प्रगती आणि विकासासाठी आमची सामायिक वचनबद्धता आम्हाला सहकार्याचे नवीन मार्ग शोधण्यासाठी प्रेरित करते. महाराष्ट्र आणि वेल्श एकत्र काम करून विकासाबरोबरच नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करू शकतो आणि अधिक समृद्ध भविष्यासाठी योगदान देऊ शकतो, असा मला विश्वास आहे.

सेंट डेव्हिड डे साजरा करताना कार्डिफ विद्यापीठाचा माजी विद्यार्थी या नात्याने मला आनंद आणि वैयक्तिक संबंधाची भावना असून माझ्यासाठी हा प्रसंग विशेष महत्त्वाचा असल्याचे श्री.रावल यांनी सांगितले. कार्डिफ विद्यापीठात असताना मी आत्मसात केलेल्या तत्त्वांनी माझ्या दृष्टीकोनाला आकार दिल्याचे त्यांनी नमूद केले. आज सेंट डेव्हिड डे साजरा करीत असताना महाराष्ट्र आणि वेल्शमधील संबंधांना जोपासण्यासाठी, सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!