प्रेमात पडली, नवऱ्याचा काटा काढण्यासाठी बायकोनं कट आखला, पण आक्रीत घडलं, नवऱ्यासह प्रियकराचाही मृत्यू

सोलापूर :- प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या प्रेयसीच्या नवऱ्याची हत्या करण्यासाठी गेलेल्या प्रियकराचाही मृत्यू झाल्याची विचित्र घटना महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये घडली. महिलेचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. ते तिच्या नवऱ्याला समजले. प्रेमात अडसर होत असल्याने तिनेच प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा काटा काढण्याचा प्लान आखला. ठरल्याप्रमाणे तो प्रियकर तिच्या नवऱ्याला मारण्यासाठी गेला. याच दोघांचाही जीव गेला.
असा आखला प्लान!
विवाहित महिलेचे तरुणासोबत प्रेमसंबंध होते. ते तिच्या नवऱ्याला समजले. यावरून त्यांच्यात भांडणं होत होती. तिच्या नवऱ्याचा विरोध होता. प्रेमाच्या वाटेतील नवऱ्याचा अडसर कायमचा दूर करायचा असा कट तिच्या डोक्यात शिजला. त्याप्रमाणं तिनं प्रियकराला सांगितलं. प्रियकरही हा अडथळा दूर करण्यास तयार झाला.
दोघेही एकत्रच दारू प्यायले अन्…
१८ फेब्रुवारीची रात्र होती. त्या रात्री गणेश सपट यानं शंकर पाटाडे याला दारू पिण्याच्या आणि जेवणाच्या बहाण्याने बाहेर बोलावून घेतले. त्यांनी एकत्रच दारू प्यायली. दोघेही सोबतच महागाव तलावावर गेले. त्यांच्यावर दारूचा अंमल चढला होता. पण गणेश सपट याच्या डोक्यात सैतान घुसला होता. शंकरला संपवायचं कसं हेच त्याच्या डोक्यात होतं. दारूची झिंग जशी चढत होती, तसे ते दोघेही झिंगाट होऊन तलावाच्या काठावरच नाचत होते. शंकर नशेत तर्र होता. त्याचा तोल जात होता. याच संधीचा गणेशनं गैरफायदा घेतला आणि डाव साधला. शंकरला त्यानं तलावात ढकललं. पण त्याचवेळी गणेशचाही तोल गेला आणि तोही तलावात पडला. खोल पाणी होता. दोघेही नशेत धुंद असल्यानं बाहेर निघताच आलं नाही आणि दोघांचाही बुडून मृत्यू झाला.
महिला अडकली पोलिसांच्या जाळ्यात
अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या नवऱ्याच्या हत्येचा कट महिलेनं रचला होता. त्यासाठी प्रियकराचीही मदत घेतली. हा कट या महिलेच्याच अंगलट आला. नवरा आणि प्रियकराचाही यात मृत्यू झाला. ही घटना उघड झाल्यानंतर पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.