मराठीच्या भवितव्याची चिंता करण्याऐवजी आत्मचिंतन करा
अमरावती :- मराठी भाषा गौरव दिन प्रत्येकांसाठी गौरवाची बाब आहे, पाश्चिमात्य देशांची मराठी भाषाविषयीची उत्सुकता आणि मराठी प्रांतातील उदासिनता यातूनच मराठीचे भवितव्य दिसते. त्यामुळे मराठी भाषेची चिंता करण्याऐवजी आत्मचिंतन करा, असे प्रतिपादन रिध्दपूर मराठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश अवलगांवकर यांनी केले. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यापीठातील पदव्युत्तर मराठी विभाग व विदर्भ साहित्य संघ, शाखा अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात कुलगुरू डॉ. अविनाश अवलगावकर यांचे ‘मराठीचे भवितव्य’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. विचारपीठावर अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, प्रमुख अतिथी तथा विदर्भ साहित्य संघाचे कार्यकारिणी सदस्य, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, विशेष अतिथी म्हणून दै. हिंदुस्थानचे प्रबंध संपादक तथा विदर्भ साहित्य संघाच्या अमरावती शाखेचे अध्यक्ष श्री विलास मराठे, मराठी विभागप्रमुख डॉ. मोना चिमोटे यांची उपस्थिती होती.
डॉ. अवलगांवकर पुढे म्हणाले, संत गाडगे बाबा खरे तर मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू आहेत, ज्यांनी कोणतेही पुस्तक वाचन न करता जनजागरण केले. कुसुमाग्रजांचे मराठी भाषेसाठींचे प्रयत्न कदापि विसरता येणार नाहीत. मराठी भाषेवर अऩेक आक्रमणे झालीत. त्यामुळे आता मराठीच्या भवितव्याची आपल्याला जाणीव होते आहे व त्यासाठी आपली स्पष्ट भूमिका देखील असणे तितकेच आवश्यक आहे. मराठीने अनेक भाषांना पचविले देखील आहे आणि अशी भाषा अधिक समृध्द होत असते, असेही ते म्हणाले. विदेशात आपल्या भाषेचा गौरव करतांना जसे एकत्र येतो, तसे जर झाले, तर भवितव्याची चिंता करण्याची गरज पडणार नाही.
भाषेचा संबंधच नोकरीशी जोडल्या गेला. ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे. भाषा हे माध्यम आहे, पुस्तकांशी मैत्री करा, भाषेवर प्रेम करा, प्राथमिक शिक्षणापासूनच आपल्या भाषेसाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. विचाराची अभिव्यक्ती आपल्याच भाषेतून निर्माण झाली पाहिजे आणि भाषेचे भवितव्य देखील आपल्याच हातात आहे, असेही डॉ. अवलगांवकर म्हणाले.
प्रमुख अतिथी कुलसचिव डॉ. अविनाश असनारे म्हणाले, कॉन्व्हेंट संस्कृतीने आपण आपल्या भाषेपासून दूर गेलो. मराठी भाषेसाठी लढणारे कुसुमाग्रज यांच्या प्रयत्नांना देखील विसरता येणार नाही, असे एका उदाहरणाव्दारे त्यांनी पटवून दिले. इंग्रजी भाषेतून शिक्षण घेत असतांना पुढे आपल्याच भाषेचे भाषांतर करण्याचा प्रसंग येऊ देऊ नये, असेही कुलसचिव म्हणाले. याप्रसंगी विदर्भ साहित्य संघाचे अमरावती शाखाध्यक्ष श्री विलास मराठी यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करतांना सांगितले, मराठी भाषेचा गौरव सदैव रहावा, भाषेचा आदर आणि तिचा वारसा वृध्दींगत व्हावा, यासाठी मराठी माणसाने पुढे आले पाहिजे, असे सांगून मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.
अध्यक्षीय भाषण करतांना प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे म्हणाले, मराठी माध्यमातून शिक्षण घेण्याचे प्रमाण पाहता आपणच आपल्या मातृभाषेपासून दूर जात आहोत का ? हा चिंतनाचा विषय़ होऊ शकेल. मानवी जीवनाचे चिंतन म्हणजे भाषा, आपली भाषा समृध्द होण्यासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज असून सर्वांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगावा, असे प्र-कुलगुरू म्हणाले.
संत गाडगे बाबा व कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण, दीपप्रज्वलन करुन विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्तविकातून आयोजनामागील रुपरेषा डॉ. मोना चिमोटे यांनी सांगितली. याप्रसंगी श्री सोपान चचाने व्दितीय मेरीट आल्याबद्दल व अमर डांगे याने नेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यापीठाच्यावतीने प्र-कुलगुरू डॉ. ढोरे यांनी तर विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिका-यांकडून कुलगुरू डॉ. अविनाश अवलगांवकर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रणव कोलते यांनी करुन दिला. सूत्रसंचालन व आभार डॉ. अभिजित इंगळे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठातील प्राध्यापकवृंद, शिक्षक तसेच विदर्भ साहित्य संघाचे डॉ. सतिश तराळ, डॉ. अण्णा वैद्य, डॉ. शोभा रोकडे, डॉ. वर्षा चिखले, यांच्यासह विदर्भ साहित्य संघाचे कार्यकारिणी सदस्य, डॉ. माधव पुटवाड, प्राचार्य पी.आर. राजपुत, डॉ. प्रमोद गारोडे, डॉ. यादवकुमार मावळे, डॉ. राजेंद्र राऊत, डॉ. पंकज वानखडे, डॉ. मिता कांबळे, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, अमरावती शहरातील साहित्यप्रेमी नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.