शेअर मार्केटमध्ये लाखो रुपये बुडाल्यानं तरुणाने स्वतःला पेटवून घेत जीवन संपवलं

नाशिक :- शेअर मार्केटमध्ये सध्या मोठी हालचाल होत असून सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये मोठी पडझड झाली आहे. याचा थेट फटका गुंकवणुकदारांना बसला असून अनेक गुंतवणूकदारांच्या पैशांचा चुराडा झाला आहे. शेअर मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक बुडाल्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या 30 वर्षीय तरुणाने आत्महत्या करत जीवन संपवलं.
बुधवारी नाशिकच्या सातपूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली. शेअर मार्केटमध्ये सुमारे 16 लाख रुपये बुडाल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या रवींद्र शिवाजी कोल्हे या 30 वर्षीय तरुणाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले. या घटनेत तरुण 98 टक्के भाजला होता. तरुणावर तीन दिवस रुग्णालयात उपचार करण्यात येत होते, मात्र शुक्रवारी उपचार सुरू असताना तरुणाचा मृत्यू झाला.
30 वर्षीय तरुण रवींद्र शिवाजी कोल्हे हा चांदवड तालुक्यातील विटाई येथील रहिवासी होता. नंतर तो खुटवडनगर परिसरात राहून एका खासगी इन्शुरन्स कंपनीत नोकरीला होता. त्यानंतर तो खासगी बँकेत नोकरी करू लागला. नोकरीतून मिळत असलेल्या पैशातून त्याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली होती. परंतु शेअर मार्केट पडल्याने कंगाल झाल्यामुळे तो नैराश्यात होता. यावेळी त्याने जवळच्या ज्योती विद्यालयाच्या मोकळ्या मैदानावर जाऊन त्याच्या दुचाकीतील पेट्रोल काढले आणि स्वतःच्या अंगावर ओतून स्वतःला पेटवून घेतले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.