‘अडीच वर्षात टेंडर घोटाळे झालेत त्याची…’, राज ठाकरेंच्या मनसेचा एकनाथ शिंदेंवर निशाणा; फडणवीसांचं कौतुक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडीच वर्षाच्या काळात मंजूर केलेल्या कामांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी सुरू केल्याची चर्चा आहे. याच मुद्द्यावरुन राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तसेच कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे माजी आमदार राजू पाटील यांनी एकनाथ शिंदेंना खोचक शब्दांमध्ये टोला लगावला आहे. राजू पाटील यांनी फडणवीसांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल त्यांचं कौतुक करत शिवसेना शिंदे गटाला निशाणा साधला आहे. शिंदे सरकारच्या काळात आरोग्य विभागाकडून स्वच्छतेसंदर्भात देण्यात आलेलं कंत्राट फडणवीस यांनी नुकतेच रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर राजू पाटील यांनी निशाणा साधला.
शिंदे शिवसेना विरुद्ध राजू पाटील
राजू पाटील आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या अडीच वर्षांच्या कालावधीत कल्याण ग्रामीण मतदारसंघातील कामांवरुन चांगलाच संघर्ष रंगला होता. एकनाथ शिंदेंबरोबरच त्यांचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदें यांच्यासोबतही राजू पाटील यांचे मतभेद अनेकदा कल्याण-डोंबिवलीमध्ये चर्चेत असल्याचं दिसलं. सध्या फडणवीस सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांमध्ये घेतलेल्या अनेक निर्णयांची चौकशीचा सपाटा सुरु असताना राजू पाटील यांनी याच मुद्द्यावरुन शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे.
पाच वर्षे देखील कमी पडतील
“ज्या प्रमाणात या लोकांमध्ये भ्रष्टाचार फोफावला होता कुठेतरी फडणवीस त्याला आळा घालता आहेत. फडणवीस चांगलं काम करत आहेत,” असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे. “40 टक्क्यांहून अधिक फरकाने कामे दिली जातायत त्याची देखील चौकशी झाली पाहिजे. फडणवीस चांगलं काम करत असून चांगल्या कामाचे स्वागत झालं पाहिजे. पैसे जनतेचा आहे. घोटाळा करून पैसे कमवणार त्यातून राजकारण करणार. अडीच वर्षात टेंडर घोटाळे झालेत त्याची चौकशी करायला पाच वर्षे देखील कमी पडतील,” असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांच्या टीकेचा रोख हा शिवसेना शिंदे गटाच्या दिशेने होता.
आरोग्य विभागाचा तो निर्णय रद्द; फडणवीसांनी थांबवलं टेंडर
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेण्यात आलेला आणखी एक निर्णय चौकशीच्या फेऱ्यात आला आहे. आरोग्य विभागातील यांत्रिकी पद्धतीनं स्वच्छता करण्याचं कंत्राट राज्य सरकारकडून रद्द करण्यात आलं आहे. दरम्यान यामुळे तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे संशयाच्या फेऱ्यात आहेत.
तानाजी सावंतांच्या काळातील टेंडर का रद्द करण्यात आलं?
3200 कोटींच्या कामांना फडणवीसांनी स्थगिती दिली आहे. सरकारी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे येथे बाह्य यंत्रणेद्वारे सफाई करण्याचा करार करण्यात आला होता. त्यासाठी वार्षिक 638 कोटी रुपये तर 3 वर्षांसाठी एकूण 3 हजार 190 कोटी रुपयांचे कंत्राट खासगी कंपनीला देण्याला आला होता. मात्र, कोणताही अनुभव नसताना सदर कंपनीला कंत्राट दिल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी या कामाला ब्रेक लावला आहे.
जालन्यातील प्रकल्पाचं कामही फडणवीसांनी थांबवलं
मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेल्या जालन्यातील सिडको प्रकल्पाच्या चौकशीचे आदेशही फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी दिलेत. जालन्यातील 900 कोटींच्या सिडकोच्या प्रकल्पाचे चौकशीचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश दिले आहेत. 2020 मध्ये सिडकोचा प्रकल्प अव्यवहार्य असल्यानं रद्द करण्यात आला होता. 2020 मध्ये रद्द करण्यात आलेल्या या प्रकल्पाला 2023 मध्ये एकनाथ शिंदेंनी गती दिली होती. जालन्यातील पाणीटंचाई आणि कमी खरेदीच्या क्षमतेमुळे प्रकल्प व्यवहार्य होणार नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यानंतर या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत.