ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर आंदोलन, पोलिसांचा मोठा बंदोबस्त

ठाणे :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर ठाण्यातील सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांनी आंदोलन सुरू केलं आहे. हातात फलक घेऊन मोठ्या संख्येने कामगार एकत्र आले आहेत. सुपरमॅक्स कंपनीतील कामगार आणि त्यांचे कुटुंबीय विविध समस्यांबाबत एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर मोर्चा नेत ठिय्या आंदोलन करत आहेत. या ठिय्या आंदोलनानंतर या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
ठाण्यातील तीन हात नाक्याशेजारी सुपरमॅक्स ही मोठी कंपनी होती. या काम करणाऱ्या कामगारांना त्यांचे पगार मागील तीन वर्षांपासून देण्यात आलेले नाहीत. ही कंपनी तीन वर्षापूर्वी बंद पडलेली आहे. तेव्हापासून मालकाने या कंपनीतील कर्मचाऱ्यांना त्यांची कोणतीही देणी दिलेली नाहीत. मागील काही महिन्यांपासून आपल्या समस्यांसाठी, देणी मिळण्यासाठी कर्मचारी आंदोलन करत आहेत.
याआधीही कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर स्थानिक नेत्यांसह एकनाथ शिंदे, या परिसरातील नगरसेवक, आमदार यांनी कर्मचाऱ्यांना तुमची देणी परत मिळवून देऊ असं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्यापदेखील कर्मचाऱ्यांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत. अखेर हे सर्व कर्मचारी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घराबाहेर आले असून त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं आहे. आंदोलकांनी मल्होत्रा फॅमिली तुपाशी, कामगार उपाशी…अशा आशयाचे पोस्टर घेऊन शेकडोच्या संख्येने कामगार उपमुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करत आहेत.
काय आहेत कर्मचाऱ्यांचे आरोप?
जुलै २०२२ पासून या सुपरमॅक्स कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार थकीत आहेत. डिसेंबर महिन्यात कंपनीकडून कोणतीही नोटीस न देता थेट कंपनी बंद पडल्याचं सांगण्यात आलं आणि कामावरुन काढून टाकण्यात आलं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून लेखी उत्तर मिळावे अशी मागणी आंदोलनकर्त्या कामगारांची आहे. तसंच कंपनीचा मालक लंडनला पळून गेल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
घटनास्थळी खासदार नरेश म्हस्के यांनी हजर होत आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी हा विषय कोर्टात असल्याचं सांगत ते आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत