मातेच्या ममतेला काळीमा! – नांदेडच्या माळझरा येथे नवजात बालिकेला जिवंत फेकले!

नांदेड :- आई ही देवाची दुसरी रूप असते असं म्हटलं जातं, पण नांदेडच्या हदगाव तालुक्यात माळझरा येथे मातेच्याच ममतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका निर्दयी आईने अवघ्या काही तासांच्या नवजात स्त्री जातीच्या बाळाला शेतात फेकून दिलं. या निर्दयी कृत्याने संपूर्ण गाव हादरून गेलं आहे.
नेमकं काय घडलं पाहूया आमच्या या खास रिपोर्टमध्ये!
ही घटना आहे हदगाव तालुक्यातील माळझरा गावातील. काल संध्याकाळी शेताकडे जाणाऱ्या एका गावकऱ्याने कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकला. कुतूहलाने तो त्या दिशेने गेला आणि जे काही पाहिलं ते हृदय पिळवटून टाकणारं होतं! पाला-पाचोळ्याच्या ढिगाऱ्याखाली अवघ्या एक ते दोन दिवसांचं नवजात स्त्री जातीचं बाळ निष्पाप डोळ्यांनी जग पाहतं होतं.
त्या चिमुकलीच्या अंगावर किरकोळ जखमा होत्या, पण ती सुदैवाने जिवंत होती. गावकऱ्यांनी तातडीने तिला उचलून सुरक्षित स्थळी नेलं आणि पोलिसांना याची माहिती दिली. सध्या बाळाची प्रकृती स्थिर असून तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या अमानवीय कृत्यामुळे संपूर्ण गाव हादरलं आहे. एक निष्पाप जीव जगाशी लढा देत होता आणि तिला टाकून जाणारे पालक मात्र कुठेतरी लपून बसले आहेत. गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना शोधून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
नवजात बाळाचं भविष्य काय? तिचा गुन्हा काय? केवळ मुलगी म्हणून तिला टाकून देणाऱ्या त्या निर्दयी लोकांना कायद्याने कठोर शिक्षा होईल का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे! आईच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या अमानवीय घटनेमुळे माणुसकी लज्जास्पद ठरली आहे. समाजात अजूनही कन्याभ्रूण हत्या आणि स्त्रीभ्रूण विरोधी मानसिकता जिवंत आहे का? या घटनेमुळे पुन्हा एकदा विचार करायला लावणारा प्रश्न समाजासमोर उभा राहिला आहे. या निर्दयी कृत्याला कोण जबाबदार आहे? आणि या बाळाचं पुढे काय होणार? यावर तुमचं काय मत आहे? आम्हाला नक्की कळवा!