राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर अमरावतीचा नावलौकिक वाढविणाऱ्या क्रीडारत्नांचा सत्कार..
अमरावती :- अमरावतीच्या मातीतून अनेक प्रतिभासंपन्न खेळाडू घडले आहे. परंतु निरंतरता व सातत्य नसल्याने आज अनेक क्रीडा मंडळे व माजी खेळाडू तसेच प्रतिभावंत क्रीडापटू हे समाजामध्ये दुर्लक्षित राहिले आहे. याचाच परिणाम आजच्या नवीन पिढीवर दिसून येत असून मोबाईलच्या युगात त्यांना खेळाकडे आकर्षित करणे व मैदानाकडे वळविणे एक आव्हानच बनले आहे. त्यामुळे खेळाडूंच्या अडचणी दूर करून क्रीडा मंडळांचा विकास व क्रीडा संघटनांची सांगड घालून अमरावतीमधून चांगले क्रीडापटू घडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. अमरावतीचे क्रीडा वैभव जपण्यासाठी आजी-माजी खेळाडूंच्या अनुभवातून शहराच्या क्रीडा क्षेत्राला नव्या उंचीवर न्यायचे आहे. यासाठीचा आजचा सत्कार समारंभ हा समाजात खेळाडूंप्रतीचे औदार्य वाढविणारा असल्याचे गौरवोद्गार अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी व्यक्त केले.
अमरावती क्रीडा विकास समितीच्या वतीने आयोजित क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवर अमरावतीचा नावलौकिक वाढविणाऱ्या खेळाडू व क्रीडापटुंच्या सत्कार समारंभ शनिवार दिनांक ०१ मार्च २०२५ रोजी अभियंता भवन येथे मोठ्या थाटात पार पडला. या समारंभामध्ये अध्यक्षीय भाषण करतात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर शहराच्या क्रीडा क्षेत्रातील जेष्ठ व्यक्तिमत्व भाऊ बेलसरे, शिवाभाऊ लड्ढा, अर्जुन पुरस्कार प्राप्त निताताई दळवी,जिल्हा क्रीडा अधिकारी अमरावती गणेश जाधव, राज्य ऑलम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष ऍड. प्रशांत देशपांडे, अमरावती क्रीडा विकास समितीचे संयोजक संजय खोडके , चंद्रपूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, प्रा. डॉ. एम. टी. नाना देशमुख, दिनेश देशमुख, राजाभाऊ देशमुख, बाळासाहेब रोडे, माजी महापौर ऍड. किशोर शेळके, माजी नगरसेवक प्रशांत डवरे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना आमदार सौ. सुलभाताई खोडके म्हणाल्या की, अमरावती शहरात क्रीडासेवा सुविधांची निर्मिती तसेच खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी व क्रीडा क्षेत्राच्या बळकटीसाठी मागील काळापासून प्रयत्न सुरु आहे. निरोगी व जीवन व सुदृढ आरोग्यासाठी खेळ-क्रीडा कौशल्य जोपासणे आवश्यक आवश्यक असल्याने मैदानाचा विकास करून नागरिकांना मैदानाकडे वळविण्यासाठी चांगल्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहे. अमरावतीचा क्रीडा विकास हाच आमचा श्वास असून अमरावतीच्या क्रीडा प्रतिभांचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे आपल्या माणसांचा सत्कार करणे हे आमचे कर्तव्य आहे. शहराच्या विविध क्षेत्रात सक्रिय राहून जितेंद्रसिंह ठाकूर यांनी कबड्डी या पारंपरिक खेळाला आपलं अख्ख आयुष्य समर्पित केलं. एक खेळाडू ते भारतीय कब्बडी फेडरेशनचे महासचिव पर्यंतचा त्यांचा प्रवास हा खडतर व अनेक उतार चढावांनी भरलेला आहे. त्यांचा आज सन्मान होणे ही अमरावतीसाठी गौरवाची बाब असल्याचे प्रतिपादन आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी केले. दरम्यान कबड्डीच्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त व्यक्तिमत्व जितेंद्रसिंह प्राणसिंह ठाकूर यांचा भारतीय कबड्डी फेडरेशनच्या महासचिव पदी निवड झाल्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आला. आपल्या सत्काराला उत्तर देतांना भारतीय कबड्डी फेडरेशनचे महासचिव जितेंद्रसिंह ठाकूर यांनी सांगितले की, देशातील इतर राज्यात खेळांचा बोलबाला होत असतांना त्या दृष्टीने विदर्भ व प्रामुख्याने अमरावती जिल्हा मागे पडत आहे.आजच्या पिढीमध्ये खेळाची भावना निर्माण करण्यासाठी अमरावती क्रीडा विकास समितीच्या वतीने घेण्यात आलेला पुढाकार हा ऊर्जादायी असून शहरातील क्रीडा मंडळे, आजी-माजी खेळाडू व क्रीडा प्रेमींना नवीन संजीवनी देणारा असल्याची कृतज्ञता जितेंद्रसिंह ठाकूर यांनी व्यक्त केली. या दरम्यान नॅशनल गेम मेडलिस्ट खेळाडू जलतरण मधून कु.दीप्ती आशिष काळमेघ , यश संजय दुर्गे, पार्थ सुनील अंबुलकर, प्रा.डॉ. योगेश निर्मळ. आर्चरी मधून मानव जाधव,पवन सदानंद जाधव कु. कुमकुम मोहोड ,कु. मधुरा धामणगावकर, कु. पूर्वशा सुधीर शेंडे, गौरव चांदणे , प्रशिक्षक प्रफुल्ल डांगे तर सॉफ्टबॉल साठी डॉ. अभिजीत फिरके, कौस्तुभ चंद्रकांत गाडगे, प्रशिक्षक डॉ. अभिजीत हेमंत इंगोले, तनिष गजेद्र मालठाणे, इंद्रांशसिंह राकेश बडगुजर (स्क्याश) यांचा सत्कार करण्यात आला. तर हर घर तिरंगा अभियान राबविण्याबद्दल श्री संतोष अरोरा सर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शहरातील क्रीडा क्षेत्रातील मान्यवर,विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, आजी-माजी खेळाडू क्रीडा शिक्षक, तसेच क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बॉक्स:- आजी-माजी क्रीडापटूंच्या अनुभव व ऊर्जेतून अमरावतीच्या क्रीडा वैभवाचे जतन झाले पाहिजे- संजय खोडके...
या सत्कार समारंभाचे प्रास्ताविक करतांना अमरावती क्रीडा विकास समितीचे संयोजक संजय खोडके यांनी शहरातील गेल्या काळात ज्या पद्धतीने क्रीडापटू घडले. व त्यांनी ज्यापद्धतीने खेळांप्रती समर्पण दिले , त्या काही आठवणींना उजाळा दिला. मागील काळातील क्रीडा मंडळे आज मागे पडली आहे. ज्यांनी क्रीडा क्षेत्रासाठी आयुष्य वेचिले, ते आज दुर्लक्षित राहिले आहे. समाजातही खेळाडूंप्रती औदार्य कमी झाले आहे. म्हणूनच अमरावतीला क्रीडा क्षेत्रात नवा आयाम, गनिमा व लौकिक मिळवून देण्यासाठी आज आजी-माजी खेळाडू, क्रीडा मंडळे व संघटनांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे. मैदानी खेळासाठी खेळाडू तयार व्हावे यासाठी आजी-माजी क्रीडापटूंच्या अनुभव व सत्कार महत्वाचा आहे. शहरातील क्रीडा मंडळांच्या अडचणी सोडवून तसेच खेळाडूंना सर्वतोपरी मदत करून अमरावतीमधून चांगल्या दर्जाचे क्रीडापटू घडविण्यासाठी व तो पुढे राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी तयार व्हावा, या उद्देशाने अमरावती क्रीडा विकास समिती चांगल्या पदधतीने काम करणार असल्याचे मनोगत संजय खोडके यांनी व्यक्त केले.