विदर्भाने 7 वर्षांनी जिंकली रणजी ट्रॉफी!

नागपूरच्या जामठा स्टेडियममध्ये सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विदर्भाने दणदणीत विजय मिळवला आहे. पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर विदर्भाने रणजी ट्रॉफीवर तिसऱ्यांदा नाव कोरले आहे. विदर्भाने तब्बल 7 वर्षांनी ही रणजी ट्रॉफी जिंकली असून एकही सामना न गमावता चॅम्पियन ट्रॉफीवर विदर्भानं तिसऱ्यांदा नाव कोरले आहे. यापूर्वी 2017-18 आणि 2018-19 मध्ये सलग दोनदा रणजी ट्रॉफीवर विदर्भाने अजिंक्यपद पटकावलेले आहे. अशातच यंदाच्या मोसमात विदर्भाने अनेक मोठ्या संघांना धूळ चारत आज पुन्हा दणदणीत विजय संपादन केला आहे.
फायनलमध्ये विदर्भच्या संघाने पहिल्या डावात 379 धावा काढल्या, तर केरळचा संघ 342 धावांवर बाद झल्याने विदर्भाला 37 धावांची महत्वाची आघाडी मिळाली होती. दरम्यान हीच आघाडी निर्णायक ठरली आहे. तर दुसऱ्या डावात देखील विदर्भाने 375 धावा केल्या होत्या. यातील पहिल्या डावात मिळालेल्या आघाडीच्या जोरावर विदर्भाचा संघ विजयी झाला आहे.
विदर्भाच्या हर्ष दुबेनं विकेट्सचा पाऊस पाडत रचला इतिहास
विदर्भाच्या हर्ष दुबेने रणजी ट्रॉफीच्या एका मोसमात सर्वाधिक विकेट घेण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. एका मोसमात 69 विकेट्स घेऊन मोठमोठ्या गोलंदाजांना 22 वर्षांच्या हर्षने मागे टाकले आहे. विदर्भाच्या संघांना रणजी ट्रॉफी जिंकली आहे. अंतिम सामन्यात विदर्भाने पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर केरळचा पराभव केला आहे. यंदाच्या मोसमात विदर्भाने मुंबई आणि केरळसह अनेक मोठ्या संघांना धूळ चारली आणि विदर्भाच्या या चमकदार कामगिरी मागे विदर्भाचा तरुण ऑलराऊंडर हर्ष दुबे अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. हर्षद दुबे ने यंदाच्या मोसमात तब्बल 69 विकेट्स घेतले असून रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एका मोसमात एका गोलंदाजाने एवढे विकेट्स घेण्याचा हा विक्रम आहे. फलंदाजी मध्येही हर्षने चांगली कामगिरी बजावत 475 धावा केल्या. त्यामुळे हर्षदुपेची अष्टपैलू कामगिरी विदर्भाच्या रणजी ट्रॉफी मधील विजयामध्ये अत्यंत मोलाची ठरली आहे.
दानिश मलेवारची दमदार कामगिरी
रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये विदर्भाने सहजरित्या केरळचा पराभव केला आहे. विदर्भाच्या या विजयामध्ये फलंदाजांची कामगिरी महत्त्वाची ठरली असून त्यामध्ये दानिश मलेवारचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. दानिशने रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात केरळ विरोधात पहिल्या डावात 153 तर दुसऱ्या डावात 73 धावांची चमकदार कामगिरी केली. विशेष म्हणजे दोन्ही वेळेला विदर्भाचा डाव गडगडला असताना दानिशने चिकाटीने फलंदाजी करत विदर्भाचा डाव सावरला आणि रणजी ट्रॉफी मधील अत्यंत महत्त्वाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली आहे.
विशेष म्हणजे दानिशचे वडील एका छोट्या खाजगी बँकेत कलेक्शन एजंट म्हणून काम करतात. अत्यंत संघर्षाच्या परिस्थितीतून दानिश विदर्भाच्या संघात पोहोचला आणि आज रणजी चॅम्पियन विदर्भाच्या संघाचा महत्त्वाचा आधारस्तंभ ठरला आहे.