उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

अमरावती :- मार्च महिन्यापासून उन्हाच्या झळा जाणवतात. त्याची तीव्रता मार्चपासून मेपर्यंत वाढते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, अशक्तपणा वाढणे, काम कमी केले तरी जास्त थकवा जाणवणे, तसेच घामावाटे पोषकद्रव्ये शरीराबाहेर टाकली जाण्यास सुरुवात होते. तापमान बदल व वाढत्या उष्णतेमध्ये पुरेशी काळजी घेतली नसल्यास उन्हाळ्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे नागरिकांनी उन्हाळ्यात आरोग्य सांभाळावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.
उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांमध्ये प्रामुख्याने अतिसारासारखे पचनक्रियेशी संबंधित आजार आणि उष्माघाताचा समावेश असतो. याशिवाय त्वचेसंदर्भात समस्या देखील उद्भवतात. उघड्यावरील अन्न किंवा द्रवपदार्थ खाण्यापिण्यात आल्याने पचनाशी संबंधित आजार उद्भवू शकतात.
याबाबत नागरिकांनी दोन पद्धतीने काळजी घ्यावी. यात पहिले म्हणजे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होवू देवू नये आणि दुसरे म्हणजे विनाकारण उन्हामध्ये बाहेर जावू नये. कामानिमित्त बाहेर जायचे असल्यास छत्री, टोपी, हेल्मेट परिधान करावे. या सुरक्षा कवचामधील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे घरातील स्वच्छ पाणी आहे. बाहेर जाताना पाण्याची बाटली घेवून निघावे. त्याचबरोबर सैलसर, सुती आणि शक्यतो फिकट रंगाचे कपडे घालावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्याला डिहायड्रेशन म्हणतात, जेव्हा शरीरातून द्रव पदार्थ शरीरातून जास्त प्रमाणात बाहेर पडतात. तेव्हा ही स्थिती उद्भवते. ही स्थिती उन्हाळ्यात सामान्य असते. आपल्या शरीरातून घामावाटे किंवा लघवीवाटे पाणी बाहेर जात असते आणि तेवढ्या प्रमाणात पाणी शरीरात गेले नसल्यास तहान वाढवते.
उन्हाळ्यात उष्माघात ही समस्या आहे. तीव्र उष्णता असलेल्या भागात ही समस्या आढळून येते. उन्हाच्या संपर्कामुळे शरीरातील तापमान वाढल्यामुळे ही अवस्था उद्भवू शकते. यामध्ये डोकेदुखी, चक्कर येणे, नाकातून रक्त येणे, पोटात किंवा पायात गोळा येणे, तीव्र परिणाम झाल्यास व्यक्ती बेशुद्ध पडू शकतो ही प्रमुख लक्षणे आहे. ही लक्षणे आढळल्यास शरीरातील पाण्याच्या प्रमाणावर कटाक्षाने लक्ष ठेवावे. पाणी पित राहावे. गरज नसल्यास बाहेर पडू नये. सामान्य नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी तीव्र उष्णतेत शक्यतो दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर जाण्यास टाळावे. उन्हाळ्यात उपाशी राहणे आणि अतिरिक्त खाणे टाळावे. रात्रीच्या जेवनात हलक्या आहाराचा समावेश करावा. तीव्र उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण घटत असल्याने दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे.
उन्हाळ्याचे संपूर्ण चार महिने योग्य आहार घेणे हे उन्हाच्या त्रासापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी महत्वाचे आहे.
नागरिकांनी तहान लागली नसली तरीही जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्यावे. तहान लागणे हे निर्जलीकरणाचे सूचक आहे. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन आणि लिंबू पाणी, बटर मिल्क, लस्सी यासारखे घरगुती पेये वापरावे, थोडेसे मीठ घालून फळांचा रस घ्यावा. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबीर, उपलब्ध फळे आणि भाज्या यासारख्या उच्च पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्या खावे.
थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपारिक वस्तू डोके झाकण्यासाठी वापरावे. सूर्य प्रकाश, उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालावे. स्थानिक हवामानाची माहिती घेऊन काम करावे. शक्यतो घर, चांगल्या हवेशीर आणि थंड ठिकाणी सावलीत रहावे. थेट सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या लाटांना अडथळा निर्माण करावे. शक्यतो घराच्या ऊन येणाऱ्या बाजूच्या खिडक्या आणि पडदे दिवसा बंद ठेवा, रात्री थंड हवा येण्यासाठी त्या खिडक्या उघडाव्यात. घराबाहेर जात असल्यास, तुमची बाहेरील कामे दिवसाच्या थंड वेळेत करा. शक्यतो ही कामे सकाळी आणि संध्याकाळी करावीत.
दुपारी बाहेर पडताना अति परिश्रमाची कामे टाळावी. अनवाणी बाहेर जाऊ नये. जास्त उन्हाळ्यात स्वयंपाक करणे टाळावे. स्वयंपाक क्षेत्र हवेशीर ठेवण्यासाठी दरवाजे आणि खिडक्या पुरेशा उघडावे. अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये किंवा मोठ्या प्रमाणात साखर असलेले पेये टाळावे. यामुळे शरीरातील द्रवपदार्थ जास्त प्रमाणात कमी होतात किंवा पोटात पेटके येऊ शकतात. उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळावे आणि शिळे अन्न खाऊ नये. पार्क केलेल्या वाहनात लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना एकटे सोडू नये. त्यांना वाहनातील तापमान धोकादायक ठरु शकते. जोखमीच्या नागरिकांना इतरांपेक्षा उष्णतेचा त्रास आणि उष्णतेशी संबंधीत आजाराचा त्रास होऊ शकतो. याबाबत अतिरिक्त देण्यात यावे.
एकटे राहणारी वयस्कर किंवा आजारी लोकांचे पर्यवेक्षन करावे. त्यांच्या आरोग्याचे दैनंदिन निरीक्षण करावे. घर थंड ठेवावे, पडदे, शटर किंवा सनशेड वापरावे. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. शरीर थंड करण्यासाठी पंखे, स्प्रे बाटल्या, ओले कापड, बर्फाचा वापर करावा. 20 अंश तापमान असलेल्या पाण्यात घोट्याच्या वरपर्यंत पाय बुडवल्याने निर्जलीकरण आणि थर्मल अस्वस्थता कमी होऊन जलद थंडावा मिळत असल्याने या उपाययोजांची खबरदारी घ्यावी.
उष्माघाताच्या घटनांसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यात प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्यावरील आरोग्य संस्थांमध्ये उष्माघात रुग्णांच्या त्वरीत उपचारासाठी कोल्ड रुम कार्यान्वित करण्यात आली आहे. उष्माघातासाठी आवश्यक औषधे, आयव्ही फ्लूईड, ओआरएस आदींची उपलब्धता तपासण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास त्वरीत पुरवठा करण्यात येणार आहे. उष्माघाताचे प्रकार हाताळण्यासाठी सर्व वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच उष्माघात नियंत्रणासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी टास्क फोर्स सभा घेऊन मार्गदर्शन केले आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले यांनी कळविले आहे.