कोथरूड येथील महादेव मंदिरासमोरील कोट्यवधींची जागा वादाच्या भोवऱ्यात.

अमरावती कोथरूड :- कोथरूड येथील महादेव मंदिराच्या समोरील जागेवरून दोन गटांत वाद उफाळून आला आहे. या वादात आरोप-प्रत्यारोपासोबतच हातघाईवर येत मारहाणीची घटना घडली आहे. नेमकं काय घडलंय?
पाहूया आमचा हा सविस्तर रिपोर्ट :-
कोथरूड येथील महादेव मंदिरासमोरील कोट्यवधींच्या किमतीची जागा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. महादेव पारधी यांनी ही जागा छगन जरुरी यांना विकल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, राहुल कडू यांनी या जमिनीवर हक्क सांगत दावा केला आहे की, त्यांच्या सासऱ्यांनी ही जागा विकलीच नाही. उलट, छगन जरुरी यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे ती बळकावण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप केला आहे.
दुसरीकडे, माजी सैनिक असलेल्या छगन जरुरी यांनी आपल्या दाव्याला आधार देत खरेदीचे सर्व कागदपत्रं वैध असल्याचे सांगितले आहे. त्यांचा आरोप आहे की, राहुल कडू आणि त्यांचे कुटुंब अवैधपणे त्यांच्या जागेवर अतिक्रमण करत आहेत.
या प्रकरणावरून दोन्ही गटांमध्ये टोकाचा वाद निर्माण झाला आणि तो इतका वाढला की, प्रत्यक्ष मारहाणीपर्यंत पोहोचला. या प्रकरणी दोन्ही गटांनी पत्रोट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
ही जमीन नेमकी कोणाची? खरेदी-विक्री व्यवहार वैध की अवैध? यावर कायदेशीर मार्गानेच तोडगा निघणार आहे. पण, त्याआधीच दोन्ही गट आमनेसामने आले आहेत. पुढील तपासात पोलिसांकडून कोणता निष्कर्ष निघतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.