दहावीच्या परीक्षेत नापास होण्याची भीती, विद्यार्थ्यानं जीवन संपवलं

नागपूर :- दहावीच्या परीक्षेतील अपयशाच्या भीतीने एका विद्यार्थ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नागपूर जिल्ह्यातील कुही बसस्थानकावर घडली. गेले अनेक दिवस हा विद्यार्थी परीक्षेच्या ताणाखाली होता.
मिळालेल्या माहितीनुसार, हा विद्यार्थी कुही शहरातील एका नामांकित शाळेचा विद्यार्थी होता. मार्च २०२४ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत तो नापास झाला होता. शासनाच्या ‘एटीकेटी’ नियमानुसार त्याने अकरावीत प्रवेश घेतला होता, मात्र त्यासाठी पूरक परीक्षेत अपयश आलेले विषय पास करणे आवश्यक होते. सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या पूरक परीक्षेसाठी त्याने तयारी केली होती, मात्र परीक्षेच्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील रस्ते बंद पडले. त्यामुळे तो परीक्षा केंद्रावर पोहोचू शकला नाही, आणि त्याचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला.
पुन्हा नापास झाल्याने तो नैराश्यात गेला होता. आता त्याच्याकडे फक्त शेवटची संधी होती, ज्यामध्ये त्याला दोन्ही विषय उत्तीर्ण करावे लागणार होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो प्रचंड मेहनत घेत होता. मात्र, इंग्रजी विषयाची भीती मनात घर करून बसली होती. परीक्षेत अपयश येईल या भीतीने तो प्रचंड तणावात होता.
शनिवारी इंग्रजीचा पेपर असल्याने मानसिक तणावाखाली असलेल्या विद्यार्थ्याने विष प्राशन केले. त्यानंतर तो कुही बसस्थानकावरच बेशुद्ध पडला. त्याच्या मित्राने ही बाब लक्षात घेऊन तातडीने त्याच्या वडिलांना कळवले. विद्यार्थ्याला लगेचच कुही येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूर मेडिकल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. परीक्षेच्या तणावामुळे विद्यार्थ्यांनी नैराश्यात जाऊ नये, यासाठी पालक आणि शिक्षकांनी त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, त्यांच्या मनातील परीक्षेच्या अपयशाची भिती दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे तज्ज्ञांचे मत आहे. या प्रकरणी कुही पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.