नागपूरमध्ये वाहन चोरीचा भांडाफोड! पोलिसांची मोठी कारवाई – ५ दुचाकींसह आरोपी जेरबंद!

नागपूर :- नागपूर शहरात वाहनचोरीच्या वाढत्या घटनांमध्ये पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. एका विधीसंघर्ष बालकासह वाहन चोरणाऱ्या टोळीला नागपूर पोलिसांनी अटक केली असून, तब्बल ५ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपींनी नागपूर आणि सावनेर भागात चोरीचे विविध गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. हा सगळा प्रकार नेमका काय आहे?
पाहुया आमचा विशेष रिपोर्ट!
नागपूर शहरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, सिताबर्डी पोलिसांनी एक मोठी कारवाई करत वाहनचोरांची टोळी गजाआड केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अमरावती रोड, महाराजबाग समोर एक संशयित इसमाला रोखले. त्याच्याकडे असलेल्या मोपेडबाबत विचारणा केली असता, तो एका वाहनचोरीच्या टोळीचा सदस्य असल्याचे उघड झाले.
तपासादरम्यान, आरोपीने आपल्या साथीदारासह नागपूर आणि सावनेर भागात चोरीच्या ५ दुचाकी लंपास केल्याची कबुली दिली. या वाहनांची एकूण किंमत जवळपास २.३० लाख रुपये इतकी आहे. तसेच आरोपींनी सावनेर येथे घरफोडी करून चोरी केल्याची कबुली दिली आहे, आणि त्यामधील मुद्देमाल अद्याप जप्त करण्याचे काम सुरू आहे.
पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपी कुणाल किसनराव बने वय ३०, रा. रामबाग, नागपूर आणि एका विधीसंघर्ष बालकाला अटक केली आहे. सदर कारवाई नागपूर शहराच्या गुन्हे शोध पथकाने तडाखेबंद पद्धतीने पार पाडली.
नागपूर शहरातील वाहनचोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. पण शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज आहे. जर कोणाला संशयास्पद हालचाली दिसल्या, तर तात्काळ पोलिसांना माहिती द्या. पुढील अपडेट्ससाठी पाहत राहा City NEWS.