अमरावतीत भीषण अपघात – दोन दुचाकींची समोरा-समोर जोरदार धडक.

अमरावती :- अमरावतीत पुन्हा एकदा भरधाव वेगाचा कहर पाहायला मिळाला आहे. विद्यापीठाजवळील फनलँड परिसरात रात्री 9 वाजता झालेल्या दुचाकी अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे.
मंगळवारी रात्री अमरावतीच्या गाडगे नगर हद्दीत फनलँडजवळ दोन दुचाकींची समोरा-समोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात वडाळी देवी नगरचा 22 वर्षीय वेदांत तांबे याचा जागीच मृत्यू झाला, तर महादेवखोरी परिसरातील वैभव शिंदे (25 वर्षे) गंभीर जखमी झाला.
वेदांत हा आपल्या मित्रांसोबत जिजाऊ नगरात नातेवाईकांकडे गेला होता. परत येताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीशी त्याची जोरदार धडक झाली. धडकेनंतर दोन्ही युवक रस्त्यावर फेकले गेले. अपघात इतका भीषण होता की, रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्या पडल्या होत्या.
गाडगे नगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, एक दुचाकी अक्षरशः चकणाचूर झाली आहे.