आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा – आ.सौ. सुलभाताई खोडके..

मुंबई :- राज्य विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मुंबई येथे सुरुवात झाली असून अधिवेशनाच्या कामकाजात अमरावतीच्या आ. सौ.सुलभाताई संजय खोडके सक्रिय झाल्या आहेत. अधिवेशनात चर्चेसाठी मांडण्यात येणाऱ्या विषयांमध्ये राज्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनां संदर्भात मुद्दे मांडतांना आ. सौ सुलभाताई खोडके यांनी शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदे व आरोग्यांच्या नाना-विध समस्यांमुळे आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्या बाबत निवेदन सादर केले असून अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालय ,जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये चांगल्या आरोग्य सेवांच्या पूर्ततेसाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्याची मागणी केली आहे.
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने मांडण्यात आलेल्या विषयांमध्ये आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय आरोग्य धोरणानुसार एकूण अर्थसंकल्पाच्या ८ % निधी सार्वजनिक आरोग्यावर खर्च होणे अपेक्षित असतांना राज्यात केवळ ४.९१ % निधी खर्च केल्या जात आहे. या कारणाने राज्यात अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे निर्माण झाली आहे. तसेच प्रशिक्षित वैदयकिय अधिकारी,व पायाभूत सुविधांची देखील कमतरता आहे. बृहत आराखड्या नुसार नवीन रुग्णालय तसेच आधुनिकीकरणाचे कामे होणे अपेक्षित असतांना जागा उपलब्ध होत नसल्याने रुग्णालयाचे कामे प्रलंबित राहलेली आहे, तसेच अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालय ,जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल औषधांचा अपुरा पुरवठा, त्याच बरोबर रुग्णालयांची दुरवस्था अश्या अनेक कारणाने आरोग्य सुविधेवर विपरीत परिणाम झाल्याने रुग्णाची प्रचंड गैरसोय होत असल्याची गंभीर बाब आ. सौ सुलभाताई खोडके यांनी निदर्शनास आणून दिली आहे. तसेच रुग्णालयात सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करणे सुद्धा आवश्यक आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये मंजूर पदांपैकी स्त्रीरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, बालरोग तज्ञ,हृदयरोग तज्ञ, परिचारिका, निम्न वैद्यकीय कर्मचारी, तंत्रज्ञ इतर अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णांना आवश्यक उपचार मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील रिक्त पदे कधी भरणार ? असा प्रश्न आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी उपस्थित केला. तसेच एका-एका वैद्यकीय अधिकाऱ्यांवर दोन-तीन पदाचा कार्यभार देऊन मर्जीतील अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन त्यांना संरक्षण दिलं जात असून जेष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना डावलून कनिष्ठ अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा प्रकार आरोग्य विभागात सर्रास सुरु आहे . या सर्व कारणास्तव आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम पाहता शासनाने आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनातुन केली आहे.
आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर लिखित उत्तर देतांना राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटले आहे की, शासकीय रुग्णालयात रिक्त पदे असल्याचे खरे आहे. पद रिक्त असल्यास संबंधित पदाचा कार्यभार व कामकाज सुरळीत होण्याच्या दृष्टीने संबंधित पदाचा अतिरिक्त कार्यभार अन्य अधिकाऱ्याकडे देण्यात येतो. पदोन्नतीबाबतची कार्यवाही सेवा ज्येष्ठतेनुसार केली जाते. अशी माहिती मंत्रीमहोदयांनी दिली आहे. राज्यातील ग्रामीण, उपजिल्हा, जिल्हा, सामान्य व स्त्री रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या पायाभूत क्ष-किरण मशीन, सोनोग्राफी मशीन, सी.टी.स्कॅन, जिल्हा स्तरावर एम.आर.आय. सेवा इत्यादी उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचे सुद्धा मंत्रीमहोदयांनी आपल्या लेखी उत्तरात अधोरेखित केले आहे. ज्यामध्ये शासनाच्या बृहत आराखड्याचा हवाला देत सर्व आरोग्य संस्थांमधून रुग्णांना औषध यादीतील सर्व औषधे मोफत उपलब्ध करुन देण्यात येत असून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणी व उपचार निशुल्क करण्यात आले आहे. आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन नव्याने मंजूर करण्यात आले आहे.असा लिखित खुलासा आरोग्य मंत्री- प्रकाश आबिटकर यांनी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या प्रश्नांना उत्तर देतांना केला आहे.