गृह उद्योगातून आत्मनिर्भर्तेकडे वाटचाल ! वडनेर गंगाईच्या गावंडे दाम्पत्याचे प्रयत्न प्रेरणादायी प्रवासाची खा.अनिल बोंडेकडून दखल

दर्यापूर :- दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येथील गावंडे दाम्पत्यांने गृह उद्योग उभारत आत्मनिर्भर्तेकडे वाटचाल केली आहे. ज्या माध्यमातून स्थानिक स्तरावर रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या प्रयत्नांची व प्रेरणादायी प्रवासाची थेट राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी दखल घेत गावंडे दाम्पत्याचे कौतुक केले आहे.
दर्यापूर तालुक्यातील वडनेरगंगाई येथील धनंजय गावंडे आणि त्यांच्या सहचारिणी मालती यांनी गृह उद्योग उभारून स्वयंरोजगाराची कास धरली आहे. स्वास्तिक गृह उद्योगाच्या माध्यमातून गावंडे दाम्पत्याकडून शेवळ्या, पापड यासह इतर मसाले वर्गीय पदार्थांचे उत्पादन घेतल्या जाते. पिठगिरणी, पशुखाद्य, मिरची कांडण यंत्र यासह अन्य प्रकारच्या गृह उद्योगाचं जाळ त्यांच्या माध्यमातून विणण्यात येत आहे. ज्या माध्यमातून स्थानिक स्तरावर महिलांना चांगला रोजगार देण्याचा प्रयत्न गावंडे दाम्पत्याकडून केल्या जात आहे. आगामी काळात या उद्योगात विस्तार करून बचत गटांच्या इतर महिलांनाही रोजगार उपलब्ध कसा होईल यासाठी गावंडे दांपत्याकडून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी अलीकडेच त्यांचा महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांच्यातर्फे सन्मान करण्यात आला. गावंडे दांपत्याकडून गृह उद्योग उभारत आत्मनिर्भतेकडे सुरू केलेल्या प्रवासाची थेट राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी दखल घेतली आहे. महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष मालाताई डोईफोडे, अनिल गावंडे, शुभम बायस्कार, डॉ. भैय्यासाहेब गावंडे, विशाल माहुलकर, ऋषिकेश इंगळे आदीनी बोंडे यांच्या सूचनेवरून गावंडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सन्मान केला आहे.
गृह उद्योजकांना बळ देण्यासाठी प्रयत्न : डॉ.अनिल बोंडे
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ चा नारा देत आत्मनिर्भर भारताचा संकल्प घेतला आहे. हा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी
गावंडे दाम्पत्यांने उभारलेला गृह उद्योग इतरांसाठी प्रेरणादायी आहे. त्यातून गावागावात लघुउद्योगाचं जाळ निर्माण होईल. त्यासाठी गृह उद्योजकांना बळ देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया डॉ.अनिल बोंडे यांनी दिली. शासनाच्या इतरही योजनांचा गावंडे दांपत्याला कसा लाभ देता येईल यासाठी देखील आपण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.