गोंडी मोडक हत्याकांडाचा उलगडा – तीन संशयित आरोपींची नावे समोर

अमरावती :- अमरावतीत मंगळवारी भरदुपारी झालेल्या गोंडी मोडक हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. मृतकाच्या मित्राच्या चौकशीतून मारेकऱ्यांची नावे उघडकीस आली आहेत. कोण आहेत हे मारेकरी आणि काय आहे संपूर्ण प्रकरण…
पाहूया सविस्तर रिपोर्ट…
अमरावती शहरात खळबळ उडवणाऱ्या गोंडी मोडक हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. मंगळवारी भरदुपारी वडाळी भारत नगर परिसरात ऋषिकेश उर्फ गोंडी मोडक या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेत त्याचा मित्र अक्षय वासनिक जखमी झाला होता. मात्र, तो घाबरून पसार झाला होता. पोलिसांनी बुधवारी पहाटे त्याला ताब्यात घेतले आणि चौकशीतून खऱ्या मारेकऱ्यांची नावे समोर आली आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, जुन्या वादातून विजय भोसले, अतुल भोसले आणि भुऱ्या उर्फ आर्यन पवार यांनी धारदार शस्त्राने गोंडी मोडकवर हल्ला केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या अक्षयने पोलिसांना सगळी हकीकत सांगितली. या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
घटनेच्या तीन दिवसांपूर्वी गोंडी मोडक आणि विजय भोसले यांच्यात पाणी मागण्यावरून वाद झाला होता. त्याच वादाचा वचपा काढण्यासाठी या तिघांनी गोंडीवर हल्ला केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
फ्रेजरपुरा पोलीस आणि शहर गुन्हे शाखेचे पथक मारेकऱ्यांच्या शोधात रवाना झाले आहे. सोशल मीडियावर पसरलेल्या माहितीच्या आधारे काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, मात्र खऱ्या आरोपींची माहिती मिळाली नव्हती. आता पोलिसांनी त्यांच्या अचूक मागावर गस्त वाढवली आहे.
अखेर गोंडी मोडक हत्या प्रकरणातील खरे मारेकरी समोर आले असून पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे. लवकरच आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील पुढील अपडेट्ससाठी जोडलेले रहा City News !