जालन्यात शेती वादातून 36 वर्षीय तरुणावर अमानुष मारहाणीचा धक्कादायक प्रकार; लोखंडी रॉडने केली मारहाण

जालना :- जुन्या वादातून एका 36 वर्षीय तरुणाला निर्वस्त्र करुन लोखंडी रॉडने अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जालन्यात एका 36 वर्षीय व्यक्तीला चुलीवर लोखंडी रॉड गरम करुन अर्धनग्न करुन अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. हा विकृत प्रकार जालन्यातील भोकरदन तालुक्यातील अन्वा येथे घडला आहे. जुन्या शेतीच्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
36 वर्षीय व्यक्तीला चुलीमध्ये तापलेल्या गरम लोखंडी रॉडने मारहाण केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण अमानुष पद्धतीने केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. कैलास बोरडे असं या अमानुष मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या मारहाणी विरोधात दोन जणांविरुद्ध पोलिस ठाण्याच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मारहाण शेतीवरुन झालेल्या जुन्या वादातून झाल्याचं सांगण्यात येत आहे.
काय आहे नेमका वाद?
नवनाथ दौंड आणि सोनू उर्फ भागवत दौंड अशी आरोपींची नावे आहेत. कैलास बोराडेचं नवनाथ दौंडसोबत मागील काही दिवसांपूर्वी शेतीच्या प्रकरणातून वाद झाला होता. या वादातून ही मारहाण झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या वादातून केलेली मारहाण ही क्रूरतेचा कळस आहे. चुलीमध्ये लोखंडी रॉड गरम करुन कैलासच्या पायाटा, पोटाला आणि पाठीला तसेच मानेवर गंभीर जखमा केल्या आहेत.
उपमुख्यमंत्र्यांशी साधला संवाद
या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून एक आरोपी अजूनही फरार आहे.आतापर्यंत कैलास बोराडे यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आता त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आल आहे.दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कैलास बोराडे यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्यांना धीर दिलाय.तसेच त्यांचा सर्व वैद्यकीय खर्च करण्याचं आश्वासन देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोराडे यांना दिलं आहे.
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी सोनू दौंड याला अटक केली असून त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.तर उबाठाचा तालुका प्रमुख नवनाथ दौंड फरार झाला आहे.पारध पोलीस अधिक तपास करत आहेत.