बीडमध्ये अनोखा घटनाक्रम! आकाशातून घरावर पडतील पाव किलो वजनाचे २ दगड

बीड :- बीडच्या वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथे आकाशातून पाव किलो वजनाचे दोन दगड पडल्याचा प्रकार समोर आला आहे. एक दगड शेतकऱ्याच्या घरावर पडला. हा दगड इतक्या वेगाने आणि जोरात पडला की शेतकऱ्याच्या घरावरील पत्र्याला छिद्र पडून तो घरात आल्याचे दिसून आले. आकाशातून पडलेला दुसरा दगड शेतकऱ्यांच्या घराशेजारील गायरानासाठी राखीव जागेत आढळून आला.
घराच्या छप्पराला पडलं मोठं छिद्र
शेतकरी भिकाजी ज्ञानोबा अंबुरे यांच्या घरावर काहीतरी पडल्याचा मोठा आवाज सोमवारी दुपारच्या सुमारास आला. आवाज कशाचा आहे हे पाहण्यासाठी परिसरात शेतकऱ्याने शोधाशोध केली. हा शेतकरी शोध घेता घेता घरात गेल्यानंतर घरावरील पत्राला मोठे छिद्र पडल्याचे दिसून आले. घरात इतरत्र पाहणी केली असता पाव किलो वजनाचा काळ्या रंगाचा एक दगड दिसून आला. दुपारीच्या वेळेस घराशेजारील मोकळ्या गायरान जागेतसुद्धा पाव किलो वजनाचा काळ्या रंगाचा दगड आढळून आला.
संशोधनासाठी दोन्ही दगड ताब्यात
दरम्यान, तहसील प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दोन्ही दगडांचा पंचनामा केला. तर संभाजीनगर येथील ए.पी.जे. अब्दुल कलाम अंतराळ विज्ञान केंद्राच्या अभ्यासकांनी भेट देऊन संशोधनासाठी दोन्ही दगड ताब्यात घेतले आहेत. हा प्रकार उलकापाताचा असल्याची शक्यता या विषयातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. सध्या या दगडांचा अभ्यास केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
उल्कापात म्हणजे काय?
अवकाशात भ्रमण करणाऱ्या खगोलीय दगड, मातीच्या ओबडधोबड गोळ्यांना उल्का असे म्हणतात. याच उल्का पृथ्वीवर येऊन आदळल्या तर त्याला उल्कापात असं म्हणतात. दररोज एखादी तरी उल्का पृथ्वीवर पोहचते असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. मात्र रोज पडणाऱ्या या उल्का आकाराने खूपच लहान असतात त्यामुळे आपल्याला त्या पडल्याचं लक्षातही येत नाही.
अवकाशातून पृथ्वीवर येताना मोठ्या आकारांच्या उल्केचं वातावरणाशी घर्षण होऊन प्रकाश निर्माण होतो. पृथ्वीच्या वातारवणात प्रवेश केल्यानंतर निर्माण होणाऱ्या उष्णतेने अनेक छोट्या आकाराच्या उल्का पृथ्वीवर पडण्याआधीच वितळतात व त्यांचे बाष्पीभवन होऊन वातावरणातच नष्ट होऊन जातात. चंद्रवर दिसणारे खड्डे हे उल्कापातापासून तयार झाले आहेत. तेथील वातावरण पृथ्वीपेक्षा विरळ असल्याने तेथील उल्का चंद्राच्या पृष्ठभागापर्यंत पोहचतात.