भंडारा हादरलं: वकिलाचं भयानक कृत्य, मुलीच्या मैत्रिणीवर अत्याचाराचा प्रयत्न!

भंडारा :- शेजार धर्माला काळिमा फासणारी घटना समोर येत आहे. एका वकिलानं आपल्याच लहान मुलीच्या मैत्रीणीसोबत अत्याचाराचा प्रयत्न केलाय. ही धक्कादायक घटना भंडाऱ्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नराधमाला तासाभरातच बेड्या ठोकल्या आहेत. तसेच भंडारा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात लैंगिक अत्याचारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
विजय रेहपाडे असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे. तो व्यवसायानं वकील असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पीडित मुलीच्या आईनं पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आणि नराधमाला अटक केली.
पीडित मुलगी आपली आई आणि १३ वर्षीय भावासोबत राहत आहे. पीडित मुलीचे वडील शासकीय नोकरीत कार्यरत आहेत. ते कामानिमित्त दुसऱ्या ठिकाणी राहतात. पीडित मुलगी आणि आरोपीची मुलगी समवयस्क असल्यामुळे दोघींमध्ये गट्टी जमली. ३ मार्चला पीडित मुलगी आरोपीच्या घरी मैत्रीणीला बोलावण्यासाठी गेली होती. त्यावेळी फ्लॅटचे दार आरोपीनं उघडले.
तेव्हा पीडित मुलीनं मैत्रीण घरी आहे का? अशी विचारणा केली. तेव्हा विजयनं मुलगी घरात खेळत असल्याचं खोटं सांगत पीडित मुलीला घरात घेतलं. त्यानंतर घरात कुणीही नसल्याचं फायदा घेत विजयनं तिच्यावर जबरदस्ती केली. पीडित मुलीनं पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यानं तिला रोखून धरलं होतं. कशीबशी स्वत:ची सुटका करून घेत ती घरी रडत रडत आली. तिने घरात आईला सगळी आपबिती सांगितली.
संतापलेल्या आईनं थेट पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली असून, नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.