यवतमाळच्या पीसी वाघिणीची यशस्वी सुटका – उपचारानंतर नैसर्गिक अधिवासात मुक्तता!

यवतमाळ :- आज आपल्या बातमीच्या केंद्रस्थानी आहे यवतमाळमधील पीसी वाघिणीची सुटका! तब्बल २४ दिवस संघर्ष केल्यानंतर आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपचारानंतर अखेर या वाघिणीला. तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.
नेमकी काय आहे ही संपूर्ण घटना?
१ फेब्रुवारी रोजी यवतमाळच्या जंगलात एका वाघिणीच्या गळ्यात फास अडकल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या वाघिणीला ‘पीसी वाघीण’ म्हणून ओळखले जाते. जखमी अवस्थेतील वाघिणीवर वन विभागाचे लक्ष होते आणि तिला वाचवण्यासाठी ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले होते. सातत्याने नजर ठेवण्यासाठी रेस्क्यू टीम सक्रिय करण्यात आली होती.
दरम्यान, अभयारण्यातील पिलखान परिसरात २४ फेब्रुवारी रोजी वाघिणीने शिकार केली होती. रात्रीच्या वेळी शिकार खाण्यासाठी वाघिणीची हालचाल लक्षात येताच रेस्क्यू टीमने नेम साधला आणि तिला ट्रॅन्क्युलाईज केले. तात्काळ वन्यजीव तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या मदतीने वाघिणीच्या गळ्यातील तार काढण्यात आली आणि जखमेवर उपचार करण्यात आले.
यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली तब्बल सात दिवस वाघिणीवर उपचार करण्यात आले. अखेर, तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आणि तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.