‘सर’ न म्हणाल्याने ठाणेदाराची डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण – भाईगिरीला लाजवेल असा प्रकार कॅमेऱ्यात कैद!

यवतमाळ :- कायदा रक्षकांकडूनच जर कायदा मोडला गेला तर सामान्य माणसाने कोणाकडे न्याय मागायचा? असाच एक धक्कादायक प्रकार यवतमाळच्या आर्णी येथे घडला आहे.केवळ ‘सर’ न म्हणाल्याच्या कारणावरून एका निर्दोष डिलिव्हरी बॉयला ठाणेदाराने मारहाण केली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, संपूर्ण घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पाहूया हा धक्कादायक अहवाल :-
२३ फेब्रुवारीचा दिवस…
आर्णी शहरातील एक डिलिव्हरी बॉय धिरज गेडाम रोजच्या प्रमाणे त्याच्या प्रतिष्ठानात बसून कुरीअर ग्राहकांना कॉल करत होता. एका कुरीअरवर केशव ठाकरे हे नाव होते. धिरजने व्हेरीफाय करण्यासाठी कॉल करून विचारले – “केशव ठाकरे बोलताय का?”
हा साधा प्रश्न ठाणेदार केशव ठाकरे यांना चांगलाच झोंबला! “तुला माहिती आहे का मी कोण आहे? ठाणेदार आहे मी! मला सर, साहेब म्हणण्याची तुझी पद्धत नाही का?” असे म्हणत त्यांनी फोनवरच धमकी देण्यास सुरुवात केली. साधा कॉल, साधा संवाद, पण अहंकार इतका की, स्वतः ठाणेदार ठाकरे संतापाच्या भरात पोलीस कर्मचाऱ्यांसह थेट त्या प्रतिष्ठानात पोहोचले. तिथे जाऊन धिरज गेडामला अश्लील शिव्यांची लाखोळी वाहिली आणि कायद्याचा गैरवापर करत बेदम मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार प्रतिष्ठानातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात आधीच ठाणेदार ठाकरे वादग्रस्त होते. अंतरगाव येथील अवैध दारू विक्रेत्याच्या मृत्यूप्रकरणातही त्यांच्यावर संशयाची सुई आहे. आणि आता हा नवा प्रकार समोर आल्याने जनतेचा रोष अधिकच वाढत चालला आहे.
एका सामान्य नागरिकाने, केवळ ‘सर’ न म्हणाल्याने एवढा अमानुष त्रास सहन करावा का? कायद्याची रक्षा करणाऱ्या अधिकाऱ्यांकडूनच जर असा अत्याचार होणार असेल, तर न्याय कुठे शोधायचा? यवतमाळ जिल्ह्यात हा प्रकार गाजत आहे, आणि आता जनतेने या प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. City News आपल्याला या प्रकरणातील पुढील अपडेट्स देत राहील.