14 किलो सोन्याची तस्करी, लोकप्रिय अभिनेत्रीला अटक

दक्षिण भारतीय अभिनेत्री रान्या राव ही तस्करीच्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. अभिनेत्रीटे वडिल हे पोलिस खात्यात वरिष्ठ पदावर आहेत. रामचंद्र राव असं तिच्या वडिलांचे नाव आहे. रान्या राव हिला डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्री केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी केल्याचा आरोप करत तिला अटक केली आहे.
अभिनेत्रीवर 14.8 किलो सोनं जवळ बाळगल्याचा आरोप आहे. मंगळवारी संध्याकाळी रान्या राव हिला कोर्टासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडीत नेण्याआधी अभिनेत्रीची बॉरिंग रुग्णालयात वैदयकीय चाचणी करण्यात आली. अधिकाऱ्यानुसार, रान्याने दावा केला होता की, ती बिझनेससाठी दुबईला जात होती.
डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 15 दिवसांत रान्याने चारवेळा दुबईला गेली होती. त्यानंतर तपास यंत्रणांकडून तिच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात आले. त्यानंतर गोपनीय बातमीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी 3 मार्च रोजी रान्या येण्याच्या दोन तास आधी विमानतळावर पोहोचले होते. ती दुबईहून एमिरेट्सच्या विमानाने भारतात आली होती. सोमवारी संध्याकाळी 7 वाजता तिला बेंगळुरू विमानतळावरुन तिला ताब्यात घेण्यात आले.
अभिनेत्री रान्या राव लोकप्रिय अभिनेता सुदीपसोबत मानिक्या चित्रपटात झळकली होती. रान्याच्या अटकेनंतर दाक्षिणात्य सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. रान्या राव ही कर्नाटक राज्य पोलिस हाऊसिंग कॉरपोरेशनचे महानिर्देशक के. रामचंद्रराव यांची सावत्र मुलगी आहे. 4 महिन्यांपूर्वीच रान्याने जतीन हुकेरीसोबत लग्न केले होते. जतीन हा एक आर्किटेक्ट असून बेंगळुरूत त्याचे कार्यालय आहे.
रान्याच्या अटकेच्या बातमीनंतर तिच्या वडिलांशी संपर्क साधला असता त्यांनी लग्नानंतर रान्याचा आणि त्यांचा काहीच संपर्क झाला नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसंच, रन्या आणि जतीन यांचा व्यवसाय कोणता याबाबतही फारशी माहिती नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रान्याने काही सोनं तिच्या कपड्यांत लपवलेले होते. तर ती काही दागिने घालून आली होती. रान्याने तब्बल 14 किलोंच्या सोन्याची तस्करी केल्याचा आरोप आहे. आता या प्रकरणात रान्यासोबत आणखी काही लोकांचा सहभाग आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत.