अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत होळीचा मोठा बाजार, शेतमालाची बंपर आवक

अचलपूर :- होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठ्याअचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर शेतीमालाची आवक झाली. मात्र, अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे.
पाहूया संपूर्ण बातमी…
गुरुवारी अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत होळीचा मोठा बाजार भरला, ज्यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर शेतीमाल विक्रीस आणला. यामध्ये नवीन गव्हाची 9000 पोत्यांची आवक झाली असून गव्हाला 2575 ते 2700 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
याचप्रमाणे, सोयाबीनच्या 1000 पोत्यांची आवक झाली असून, सोयाबीनला 3650 ते 3900 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तूर पिकाची 4000 पोत्यांची आवक झाली असून, तुरीला 6600 ते 7200 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाची विक्री अडतीमार्फत स्थानिक व्यापाऱ्यांना केली. शेतकऱ्यांना रोख रक्कम मिळाली असली तरी, शेतीमालाला समाधानकारक भाव न मिळाल्याने त्यांची चिंता वाढली आहे. शेतकऱ्यांनी सिटी न्यूज प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, “असा परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी येऊ शकते.
होळीच्या सणानंतरही शेतीमालाच्या दरात वाढ होईल का, की शेतकऱ्यांची ही समस्या अधिक गंभीर होईल? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळावा, अशीच अपेक्षा आहे.