केक कापताना दाखवली पिस्तूल नंतर… पोलिसांना पाहून गुंडाने ठोकली धूम

पुणे :- पुण्यातील खडक पोलिसांनी वाढदिवसाच्या केक कापण्यासाठी पिस्तूल आणि सत्तूरचा वापर करून दहशत निर्माण करणाऱ्या एका गुंडाला अटक केली आहे. हा प्रकार पुण्याच्या घोरपडे पेठ येथील पीएमसी कॉलनीमध्ये घडला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
काशेवाडी, भवानी पेठ येथे राहणारा अनिकेत दीपक गायकवाड हा आपल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी पिस्तूल आणि सत्तूर घेऊन घोरपडे पेठेत उभा होता. त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि धारदार सत्तूर असल्याची माहिती खडक पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रतिबंधक पथकाला मिळाली.
३ मार्चच्या रात्री पोलीस हवालदार हर्षल दुडम आणि पोलीस अंमलदार कृष्णा गायकवाड पेट्रोलिंग करत असताना त्यांना या प्रकाराची माहिती मिळाली. तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सापळा रचला.
आरोपीचा पाठलाग आणि अटक
पोलिसांनी पाहताच अनिकेत गायकवाड पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, पोलिसांनी वेगाने पाठलाग करून काही अंतरावर त्याला पकडले. त्यानंतर पोलिसांनी त्याची कसून झडती घेतली असता, त्याच्याकडे गावठी पिस्तूल आणि दुचाकीच्या डिक्कीत धारदार सत्तूर मिळून आला.
जप्त केलेला माल
पोलिसांनी अनिकेत गायकवाडकडून गावठी बनावटीचे पिस्तूल, धारदार सत्तूर दुचाकी (एकूण किंमत – १,४५,५०० रुपये) साहित्य जप्त केले. पोलिसांनी अनिकेतसोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे. अनिकेत गायकवाडच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची चौकशी सुरू आहे. त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत का, याचा तपास केला जात आहे. ही घटना उघड झाल्यानंतर पुण्यातील स्थानिक नागरिकांकडून नाराजी आणि चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.