LIVE STREAM

Latest NewsMaharashtraSports

केवळ पारंपरिक खेळांसाठी मैदान उपलब्ध कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा अभिनव उपक्रम

मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीचे औचित्य साधत कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यात नाशिक येथे १ ते ९ मार्च २०२५ रोजी पारंपरिक खेळांचा क्रीडा महाकुंभ सुरू आहे. त्याचबरोबर श्री. लोढा यांनी केवळ पारंपरिक खेळांसाठी क्रीडांगण उपलब्ध करून दिले आहे. सुरेश (भैय्याजी) जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत या मैदानाचे भूमिपूजन करण्यात आले. विशेष म्हणजे या क्रीडांगणाला पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले आहे.

महाराणा प्रताप औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला येथील मैदान तब्बल २० हुन अधिक पारंपरिक खेळांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. यात सुरपारंब्या, लपंडाव, दोरीच्या उड्या, विटी दांडू, लगोरी, पावनखिंड दौड या खेळांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी जागतिक खेळांसाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या खेळांना सध्या मैदान मिळणंही मुश्किल झाले आहे. त्यामुळेच पारंपरिक खेळांची नव्या पिढीला ओळख करून देण्यासाठी केवळ देशी मातीतल्या खेळांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने मैदान आरक्षित केले असल्याचे, मंत्री श्री. लोढा यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने हे कार्य सिध्दीस जात असल्याचे श्री. लोढा यांनी आवर्जून उल्लेख केला.

गोवंडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे जामसाहेब मुकादम असे नामांतर

श्री. सुरेश (भैय्याजी) जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत नेत्रदीपक सोहळ्यात गोवंडी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नामांतराचा भव्य कार्यक्रम करण्यात आला. या संस्थेला थोर समाजसेवक, कायदेपंडित दिवंगत जामसाहेब मुकादम यांचे नाव देण्यात आले.

गोवंडी इथल्या संस्थेला दिवंगत मुकादम यांचे नाव देताना आनंद होत असल्याचे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले. सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीने मुकादम यांनी केलेले कार्य पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचेही श्री.लोढा म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांमध्ये मोलाची भूमिका बजावली होती. सामाजिक कामात वकिलीचा व्यवसाय अडचण ठरत असल्याने त्यांनी वकिलीची सनद ही परत केली होती. मुकादम यांचे त्याग आणि समर्पण हे गुण व्यावसायिक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरतील असेही श्री.लोढा यांनी म्हटले आहे. यावेळी भैय्याजी जोशी यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेचे स्वागत करत कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे अभिनंदन केले. लोढा यांच्या संकल्पनेतून समाजाला प्रेरणा देणाऱ्या विभुतींची नव्याने ओळख होत असल्याचे श्री. जोशी यांनी नमूद केले.

थोर संत, विचारवंत, शाहिद जवान, समाजसेवक, संशोधनात योगदान दिलेले शास्त्रज्ञ अशा महान विभूतींचे नाव या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना देण्यात येणार आहे. भारतीय सुपुत्रांच्या कार्याचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा या हेतूने औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्यात येत असल्याचे मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले.

कौशल्य विकास आणि उद्योजकता या विभागाच्या व्यवसाय व शिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला दीपक मुकादम, सुरेश भगोरिया यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!