धक्कादायक! नागपुरात NDPS पथकाची मोठी कारवाई – 8 किलो गांजासह एक जेरबंद, दोन आरोपी फरार!

नागपूर :- धक्कादायक! नागपूरमध्ये NDPS पथकाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत. अंमली पदार्थांचा हा मोठा कट उघड करत नागपूर पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे.
पाहुयात सविस्तर रिपोर्ट…
नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत NDPS पथकाने अंमली पदार्थ विरोधी गस्तीदरम्यान मोठी कारवाई केली आहे. उमर भाई प्लास्टिक फॅक्टरी समोर संशयित इसम मोहम्मद मजहर उर्फ बिलाल अब्दुल जब्बार याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून 8 किलो गांजा, एक मोबाईल आणि एक मोपेड असा एकूण 2 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या चौकशीत आरोपीने कबुली दिली की, त्याने हा गांजा फरार आरोपी मोहम्मद जाहीर अन्सारी आणि अरसलाम मन्सूर खान यांच्याकडून आणला होता. सध्या हे दोन्ही आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
अंमली पदार्थांचा सुळसुळाट रोखण्यासाठी नागपूर पोलीस सतत कार्यरत असून, या कारवाईने मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करीला धक्का बसला आहे. नागरिकांनीही संशयित हालचाली पोलिसांना कळवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागपूरमध्ये गांजाची मोठी तस्करी उघडकीस आल्यानंतर पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. फरार आरोपी लवकरच गजाआड केले जातील, असा पोलिसांचा दावा आहे. नागपूरमध्ये अंमली पदार्थांचा विळखा वाढत असल्याचे दिसत असून, याला आळा घालण्यासाठी पोलिसांची धडक मोहीम सुरू आहे.