नागपुरात धक्कादायक प्रकरण – अल्पवयीन मुलाला फूस लावून पळविले, पोलिसांनी दोघांचा केला शोध!

नागपूर :- नागपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे, जिथे एका अल्पवयीन मुलाला फूस लावून पळवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, नागपूर पोलिसांनी त्वरित तपास हाती घेत मध्यप्रदेश आणि छत्तीसगडपर्यंत जाऊन दोघांचा शोध घेतला आहे. कोण आहे ही महिला? आणि पोलिसांनी हा गुन्हा कसा उघड केला?
पाहूया सविस्तर…
नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला अज्ञात इसमाने फूस लावून पळवले असल्याची तक्रार त्याच्या पालकांनी पोलिसांकडे दाखल केली होती. पोलिसांनी तत्काळ तपास हाती घेत या प्रकरणाचा शोध लावण्यासाठी गुप्त बातमीदार आणि तांत्रिक साधनांचा वापर केला.
तपास दरम्यान पोलिसांनी मोबाईल सीडीआर ट्रेस करून आरोपींचा माग काढला. आरोपी आणि मुलगा मध्यप्रदेश व छत्तीसगडमध्ये असल्याचे आढळले. नंदनवन गुन्हे शाखेच्या मदतीने पोलिसांनी शोधमोहीम राबवली. अखेर लकडगंज डीबी पोलिसांनी अल्पवयीन मुलासह 36 वर्षीय महिलेला ताब्यात घेतले.
तपासादरम्यान ही महिला आणि मुलगा एकमेकांवर प्रेम करीत होते आणि त्यामुळेच दोघे घर सोडून पळून गेले होते, असे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणावर अधिक माहिती देताना लकडगंज पोलीस उपनिरीक्षक आदर्श भंडारे यांनी सिटी न्यूजशी संवाद साधला आणि संपूर्ण घटनाक्रम उलगडला.
ही घटना समाजासाठी एक मोठा धडा आहे. अल्पवयीन मुलांना चुकीच्या मार्गावर जाऊ नये म्हणून पालकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. पोलिसांनी वेगवान तपास करत या प्रकरणाचा उलगडा केला आहे, पण असे गुन्हे भविष्यात रोखण्यासाठी समाजानेही पुढाकार घ्यायला हवा.