बजेट मधून अमरावती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करीता स्वतंत्रपणे अधिकाधिक निधी देण्यात यावा- आ.सौ. सुलभाताई खोडके..
मुंबई : – राज्यविधीमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या कामकाजादरम्यान वर्ष २०२४-२५ च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करतांना आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करीता स्वतंत्रपणे भरीव निधी देण्यासह जिल्हा स्त्री रुग्णालयाचे नूतन इमारती मध्ये स्थानांतरण करण्याला घेऊन प्रलंबित असलेल्या कामासाठी मंजूर असलेला निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
सभागृहात बोलतांना आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी अमरावती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधील प्रभावी तत्पर रुग्णसेवा , प्रभावी व डॉक्टरांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल सभागृहाला अवगत केले. अमरावती मध्ये फेज १ आणि फेज २ मध्ये विविध आजारांवर उपचार करण्यात येते. याठिकाणी युरोलॉजीचे २२,९८४ शस्त्रक्रिया, २३,३४० प्लास्टिक सर्जरी ,बालरोग विभागामध्ये २८,२८८ पेडीडियाट्रिक्स सर्जरी , किडनी प्रत्यारोपणाच्या ४९ शस्त्रक्रिया, डायलिसिस सेवा २४ तास सुरु असून १० हजार डायलिसिस करण्यात आल्या आहेत. सुपरच्या टप्पा- दोन मध्ये कोरोना काळापासून हृदयरोग, कँसर युनिट व न्यूरॉलॉजी युनिट सुरु करण्यात आले आहे. मात्र शासनाकडून निधीचे वाटप होत असतांना अमरावती व नाशिक करिता एकत्रित बजेट करून निधी दिला जातो. ज्यामध्ये नाशिक येथे केवळ तीनच विभाग सुरु असतांना अमरावती पेक्षा अधिक निधी मिळतो. तर अमरावती येथे सात युनिट कार्यरत असतांना निधी कमी मिळतो. यावर्षी सुद्धा २५ कोटींचा निधी मंजूर करीत असतांना १२ कोटी नाशिक साठी तर अमरावती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करिता १० कोटींचा निधी वितरित करण्यात आला. म्हणून निधी देतांना अमरावती सुपर स्पेशालिटी करिता बजेट मध्ये स्वतंत्र प्रावधान करून अधिकाधिक निधी देण्याची मागणी आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी राज्यविधी मंडळातील अधिवेशनातून केली आहे. त्याचबरोबर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सेवा देण्यासाठी तज्ज्ञ व नामांकित शल्यचिकित्सकांना सेवाभावी तत्वावर बोलावण्यात येते. ते डॉक्टर चांगली सेवा बजावत असून जिल्ह्याच्या नागरी, ग्रामीण भागासह दुर्गमभाग व मध्यप्रदेशच्या सीमा भागातील रुग्णांना याचा लाभ मिळत आहे. नुकतीच अमरावती मध्ये तीन दिवसाच्या बाळावर फिस्ट इन फिटो ची शस्त्रक्रिया करण्यात आली. यासोबतच येथे फार मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया करण्यात येतात. परंतु सुपर मधील डॉक्टरांच्या मानधनासंदर्भात वार्षिक निधी १० कोटी इतका लागत आहे. मात्र शासनाने आर्थिक तरतूद केली नसल्याने त्यांना मानधन मिळत नाही. त्यामुळे डॉक्टरांना मानधन मिळण्यासाठी नियमीत बजेट मध्ये त्यांच्या वेतनाची तरतुद करावी ,जेणेकरून डॉक्टरांना मदत होईल व चांगली सेवा देता येईल. याकडे सुद्धा आमदार महोदयांनी सभागृहाचे लक्ष वेधले. त्याचबरोबर सुपर मधील महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना शासनाच्या वतीने राबविली जात असतांना त्यांचे महिन्याभरापासून ४ कोटी २१ लाख रुपये स्टेट हेल्थ सोसायटीकडे प्रलंबित आहे. ते पैसे लवकरात लवकर दिले तर ते खासगी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार करता येईल. ते पैसे सुद्धा शासनाने वितरित करण्याची मागणी आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी अधिवेशनातून केली आहे. सोबतच सुपर स्पेशालिटीमध्ये फेज थ्री चे काम सुरु करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून त्यामध्ये गॅस्ट्रोलॉजी, लिव्हर ट्रान्सप्लांट, सारखे विभाग नवीन इमारतीत सुरु करायचे आहे. नवीन इमारतीचा प्रस्ताव, यंत्र सामग्री व यासाठी लागणारे मनुष्यबळ यासाठी निधीची आवश्यकता आहे. म्हणून अमरावती येथे सुपर स्पेशालिटीमध्ये फेज थ्री सुरु करण्यासाठी बजेट मध्ये निधीची तरतूद करून पैसे उपलब्ध करून देण्याची मागणी आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे.
बॉक्स :- डफरीनचे जुने रुग्णालय नवीन इमारतीत स्थानांतरित करण्याबाबत वेधले लक्ष
दरम्यान जुने जिल्हा स्त्री रुग्णालय हे २०० खाटांच्या नूतन इमारतीत स्थानांतरित करण्याबाबत प्रतीक्षा वाढली असल्याने यासाठी लागणारा निधी देण्याची मागणी सुद्धा आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी केली आहे. डफरीन ची नूतन इमारत अशी प्रशस्त व सुसज्ज इमारत बांधून तयार आहे. ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन सुद्धा संपन्न झाले. डफरीनच्या नूतन इमारतीमध्ये विद्युतीकरणांच्या कामांकरिता ३.५७ कोटी इतका निधी तसेच फर्निचरच्या कामांसाठी ३.३७ कोटींच्या निधीची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आली आहे. परंतु अजूनही निधी वितरित न झाल्याने नूतन इमारत कार्यान्वित होण्यास विलंब लागत आहे. म्ह्णून तो प्रलंबित निधी सुद्धा लवकरात लवकर वितरित करण्याची मागणी आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी केली आहे.